वद्रा म्हणतात, माझ्या आईशी केंद्र सूडबुद्धीने वागतेय

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

"मी माझ्या 75वर्षीय आईसह ईडीसमोर चौकशीसाठी आलो आहे. एका वयस्कर व्यक्तीशी केंद्र सरकार सूड भावनेने कसे काय वागू शकते? आईने घरातील तिघांना गमावले आहे. माझ्याबरोबर असल्याने तिलाही आरोपी करण्यात आले आहे.''

- रॉबर्ट वद्रा, उद्योगपती

नवी दिल्ली : "मी माझ्या 75वर्षीय आईसह ईडीसमोर चौकशीसाठी आलो आहे. एका वयस्कर व्यक्तीशी केंद्र सरकार सूड भावनेने कसे काय वागू शकते? आईने घरातील तिघांना गमावले आहे. माझ्याबरोबर असल्याने तिलाही आरोपी करण्यात आले आहे,'' अशी भावनिक फेसबुक पोस्ट उद्योगपती रॉबर्ट वद्रा यांनी आज केली आहे. 

राजस्थानमधील जयपूर येथील कथित जमीन गैरव्यवहारप्रकरणी रॉबर्ट वद्रा आज बिकानेर येथे सक्तवसुली संचलनालयासमोर (ईडी) हजर झाले. त्याआधी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आईसोबतचा फोटोही शेअर केला. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, की जर मी एखादे बेकायदा काम केले होते, तर मग सरकारला चौकशी करण्यासाठी चार वर्षे आठ महिन्यांचा वेळ का लागला? माझ्या 75 वर्षीय आईशी सूड भावनेने का वागले जात आहे? देव आमच्यासोबत आहे, असेही या पोस्टच्या शेवटी त्यांनी लिहिले आहे. 

वद्रा यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एका मोटार दुर्घटनेत त्यांच्या बहिणीचा, तसेच मधुमेहामुळे भावाचा आणि वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर आईला नेहमी आपल्यासोबत ठेवत होतो. दोघांनीही दुःख विसरून जावे, तसेच तिला एकटे वाटू नये यासाठी तिला आपल्या कार्यालयात आपल्यासोबत वेळ घालवण्यास सांगत होतो. पण यामुळे आईलाही आरोपी करण्यात आले, असेही वद्रा यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीआधी माझी जाणूनबुजून चौकशी केली जात असल्याचा आरोप रॉबर्ट वद्रा यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidara says the Union Government are treats of my mother with retaliation