काश्मीरमध्ये युवकाला लष्कराच्या जीपला बांधले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात एका युवकाला लष्कराच्या जीपच्या पुढे बांधल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी चौकशीची मागणी केली आहे.

काश्मीरमध्ये जवानांवर स्थानिक युवक मोठ्या प्रमाणात दगडफेक करतात. शिवाय, एका टोळक्याने जवानांना मारहाण केल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. या घटनेवरून देशभरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

लष्कराच्या वाहनावर स्थानिक दगडफेक करत असल्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी जवानांनी एका युवकाला जीपच्या पुढे बांधल्याचे समजते. युवकाला जीपच्या पुढे बांधून परिसरातील गावांमधून फिरविण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. शिवाय, जो कोणी दगडफेक करेल त्याची अवस्था अशा प्रकारे केली जाईल, असे एका जवानाने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

अब्दुल्ला यांनी याप्रकरणी ट्विटरवरून या घटनेची लवकरात लवकर चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, या व्हिडिओची चौकशी सुरू आहे.

Web Title: video clip showing kashmiri youth tied in front of army jeep goes viral