
काल गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
गाझीपूर : प्रजासत्ताक दिनाला ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसेनंतर शेतकरी नेत्यांवर केंद्र सरकारने दबाव वाढवला आहे. हे आंदोलन लवकरात लवकर गुंडाळलं जावं, म्हणून सरकार हरतर्हेने प्रयत्न करताना दिसून येत आहे. हे आंदोलन गुंडळालं जाईल, अशीच शक्यता वाटत असताना आज मात्र चित्र बदललेलं दिसून येतंय. अशातच भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी एका व्यक्तीच्या थेट श्रीमुखात लगावल्याची घटना समोर आली आहे.
एका व्यक्तीवर घुसखोर असल्याचा आरोप करत त्यांनी त्या व्यक्तीच्या चक्क कानाखालीच लगावली आहे. संबंधित व्यक्ती व्यासपीठावर चढत होती. त्याला तेथील शेतकऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती व्यक्ती व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न करत राहीली. दरम्यान राकेश टिकैत यांना राग अनावर झाला आणि त्यांनी संबधित व्यक्तीच्या जोरदार कानाखाली लगावली. या सगळ्या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
#WATCH: Bharatiya Kisan Union spokesperson Rakesh Tikait slaps a person at Ghazipur border (Delhi-Uttar Pradesh). pic.twitter.com/fhRSbdlhgY
— ANI (@ANI) January 28, 2021
काल गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना आंदोलन स्थळ रिकामं करण्यासाठी नोटीस देखील प्रशासनाकडून बजावण्यात आली होती. मात्र, काहीही झालं तरी आम्ही इथून हटणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी दाखवून दिला होता. काल उशीरा रात्री या संदर्भातील हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. जोवर कायदा मागे घेणार नाही तोवर आम्ही हटणार नाही, असे आंदोलकांनी स्पष्ट केले. याचदरम्यान “व्यासपीठावर घुसणारा भाजपचाच घुसखोर होता. जे कोणी इथे वाईट हेतूने आले आहे त्यांनी निघून जावे,” असे राकेश टिकैत यावेळी म्हणाले.
हेही वाचा - सरकार बॅकफूटवर; आंदोलन सुरुच राहिल, ठाम निर्धारासह शेतकऱ्यांचा पुन्हा ठिय्या
दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यादिवशी शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे नियोजन केले होते. मात्र काही ठिकाणी या रॅलीला हिंसक वळण लागल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकर्यांचे तीव्र आंदोलन आणि दिल्लीतील परिस्थितीसंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. या बैठकीस गृहसचिव, दिल्ली पोलिस अधिकारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. व या बैठकीत अर्धसैनिक दलाच्या अतिरिक्त कंपन्या दिल्लीत तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.