भारत सोडण्यापूर्वी मल्ल्या भाजप नेत्यांना भेटला : राहुल गांधी

वृत्तसंस्था
रविवार, 26 ऑगस्ट 2018

मोदी सरकार विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याबाबत सौम्य भूमिका घेत आहे. 

- राहुल गांधी, अध्यक्ष, काँग्रेस

लंडन : कोट्यवधींची कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, ''भारत सोडण्यापूर्वी मल्ल्या भाजप नेत्यांना भेटला होता'', असा आरोप राहुल गांधींनी केला. 

भारत सोडण्यापूर्वी मल्ल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटला होता. मात्र, मी त्यांची नावं घेणार नाही. भारतीय अधिकारी मल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, मल्ल्याकडून केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) निर्णयावर आव्हान देण्यात आले. त्यामध्ये त्याने सांगितले, की भारतातील तुरुंगात नैसर्गिक दिवे आणि ताजी हवा नाही.

त्यानंतर आता मल्ल्याला मुंबई ऑर्थर रोड तुरुंगातील बराक क्रमांक 12 ठेवण्याचा विचार आहे. मल्ल्याला टीव्ही, वैयक्तिक टॉयलेट आणि बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला होणार आहे.  

राहुल गांधी पुढे म्हणाले, भारतातील कैदी 'अडचणीच्या ठिकाणी' आहेत. मात्र, विजय मल्ल्याला वेगळी वागणूक देण्यात आली. मल्ल्यासारखे भारतातील काही कैदी सभ्य असे आहेत. त्यामुळे न्याय सर्वांना समान असायला हवा. 

दरम्यान, राहुल गांधींनी यावेळी मोदी सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, मोदी सरकार विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याबाबत सौम्य भूमिका घेत आहे. 

Web Title: Vijay Mallya Met BJP Leaders Before Leaving India Says Rahul Gandhi