रामदेवबाबा : कॉर्पोरेट स्वामी

विजय तावडे
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

रामदेव बाबांच्या 'पतंजली'तून बाहेर पडणाऱया एकेक उत्पादनांची धास्ती मोठमोठ्या कार्पोरेट कंपन्यांना वाटू लागलीय. अध्यात्माचे धडे देता देता रामदेव बाबा कधी 'कार्पोरेट गुरू' बनून गेलेत कळलेच नाही. रामदेव बाबांच्या कार्यकर्तृत्वाची झेप नेमकी कुठे जाईल याचा हा गंमतशीर वेध!

खरं तर कॉर्पोरेट आणि स्वामी या दोन शब्दांचा परस्पर काहीही संबंध नाही. पण रामदेव बाबा या “योगगुरूचा” उल्लेख असाच करावा लागेल. योगासने शिकवता शिकवता रामदेवबाबा सेल्समन कधी झाले हे कळलंसुद्धा नाही. 

साबणापासून बिस्कीटापर्यंत आणि तेलापासून मँगीपर्यंत प्रत्येक गोष्टीला रामदेवबाबांनी पर्याय निर्माण केला. पतंजलीच्या नावाने प्रत्येक गोष्ट विकण्याचा धडाकाच त्यांनी लावला आहे. “पतंजलीची गंगाजळी” वाढतच चालली आहे. वैराग्य घेतलेले रामदेवबाबा कॉर्पोरेट कंपन्यांप्रमाणे हजारो कोटींची उलाढाल करू लागले आहे. प्राणायाम करता करता प्रचंड आर्थिक उलाढालीचा व्यायाम रामदेव बाबा उत्तम साधत आहेत. रामदेवबाबांच्या वाढत्या व्यापारामुळे अनेक कंपन्यांचे धाबे दणाणलेले आहे. त्या कंपन्यांच्या सीईओ आणि मुख्य सेल्स अधिकाऱ्यांना या नव्या स्पर्धेच्या ताणतणावामधून बाहेर पडण्यासाठी बहुदा रामदेव बाबांच्यांच योग शिबिरांना जावं लागेल.

रामदेवबाबा भगवी वस्त्र घालतात व स्वदेशीचा पुरस्कार करतात; पण त्यांची कार्यप्रणाली ही कॉर्पोरेट बॉसेसच्या तोडीस तोड आहे. त्यांचे मार्केटिंग तंत्र तर कॉर्पोरेट जगतालाही दखल घ्यायला लावणारे आहे. स्वदेशीचा नारा देत त्यांनी स्पर्धक कंपन्यांना “शिर्षासन” करायला भाग पाडले आहे. आणि हो पतंजलीच्या नावाने विकण्यात येणाऱ्या या उत्पादनांची विविधता प्रचंड आहे. पतंजली ऋषींनी मैदाविरहित बिस्किटे कधी खाल्ली होती, न्युडल्सचा ब्रेकफास्ट कधी केला होता व फेसक्रीम कधी लावली होती हे त्याचं त्यांनाच ठाऊक. त्यातही रामदेवबाबांचा धडाकाच असा की खुद्द पतंजली ऋषींचीसुद्धा या उत्पादनांबद्दल खात्री पटली असती.

उत्तम आरोग्यासाठी त्यांनीदेखील च्यवनप्राशऐवजी रामदेव बाबांची आवळा कँडी खाल्ली असती. कुणी सांगावं, रामदेव बाबांनी त्यांना त्यांचा पॉवरव्हिटा ही चारला असता !

सध्याच्या उत्पादनांची गती पाहता लवकरच रामदेवबाबा दुचाकी, चारचाकी वाहनांची तसेच संगणक, मोबाईल सारखी उत्पादनांची निर्मिती करतील असं दिसतं. रामदेव बाबांचा स्वदेशी नारा या उत्पादनांनाही लागू असणारच. मग, ती पेट्रोल, डीझेल किंवा विजेऐवजी फक्त गोमुत्रावर चालू शकली, तर नवल नको!

स्वदेशी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर सुरु करण्यासाठी पासवर्डची गरज असणार नाही तर त्याच्यासमोर बसून “कपालभारती” किंवा “भस्त्रिका” करावी लागेल. उद्या रामदेवबाबांनी एअर लाईन्स सुरु केली (अर्थात त्याचे नाव पतंजली एअरवेज असणार) तर त्यांच्या प्रवाश्यांना विमानप्रवासाची सुरवात “शवासनानेच” करावी लागणार ! इस्त्रोनेसुद्धा “चांद्रयान किंवा मंगळयान” मोहिमांसाठी रामदेवबाबांचीच मदत घ्यावी. मग क्षेपणास्त्र उडवण्यासाठी गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानाची गरज पडणार नाही. अवकाश वीरांच्या श्वोसोच्छ:वासाच्या ताकदीवर उपग्रह अवकाशात सोडण्यात येतील.

आता तरं काय म्हणे रामदेवबाबा स्वदेशी जीन्स सुद्धा बनवणार आहेत. पुढे मागे त्यांनी कोट, टाय ही भारतीय परंपरेतील आहेत असा दावा केला आणि त्यांचे उत्पादन सुरू केले तर आश्चर्य वाटायला नको. 

आपल्या व्यापारी क्लृप्त्यांनी आणि धडाक्यांनी कॉर्पोरेट जगतालासुद्धा अचंबित करणाऱ्या रामदेवबाबांची प्राचीन युगातील योगासने शिकवता शिकवता आधुनिक व्यापार विश्वातली भरारी पाहता त्यांना “योगगुरूच्या” ऐवजी “कॉर्पोरेट स्वामी” असंच संबोधावे लागेल. 

ओम शांती शांती शांती : सॉरी ओम कांती कांती कांती :!!!!!!!!!!

Web Title: Vijay Tawade Blog on 'Ramdevbaba'