पॉल बनून महाकाल मंदिरात पोहोचला होता विकास दुबे

सूरज यादव
Thursday, 9 July 2020

विकास दुबे मध्य प्रदेशातील उज्जैन इथं पोलिसांना शरण आला. तो राजस्थानमधील कोटा इथून रस्त्याने उज्जैनला पोहोचला होता.

नवी दिल्ली - कानपुरमध्ये गुंडांसोबत झालेल्या चकमकीचा सूत्रधार असलेला विकास दुबे मध्य प्रदेशातील उज्जैन इथं पोलिसांना शरण आला. तो राजस्थानमधील कोटा इथून रस्त्याने उज्जैनला पोहोचला होता. या प्रवासासाठी त्याने पॉल नावाने खोटं ओळखपत्र वापरलं. विकास दुबेसोबत एका दारु व्यावसायिकाला अटक केली असल्याची माहिती मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली. अटकेनंतर अशी  माहिती समोर आली होती की विकास दुबे खोट्या ओळखपत्राचा वापर करत होता. तो गुरुवारी उज्जैनमधील महाकाल मंदिरात पोहोचला होता. तिथं एका सुरक्षा रक्षकाने त्याला ओळखलं. त्याची ओळख पटल्यानंतर उज्जैन पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला अटक केली. 

विकास दुबे कानपूरमध्ये 8 पोलिसांच्या हत्येनंतर दिल्ली-एनसाआर इथं गेला होता. तिथं फरीदाबादमध्ये तो असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. मात्र पोलिसांचा छापा पडण्याआधीच तिथून विकास निसटला होता. गेल्या सहा दिवसांपासून पोलिस विकासचा शोध घेत होते. उज्जैनमध्ये अटक केलेला विकास दुबे सध्या उज्जैन पोलिसांच्या ताब्यात आहे. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली आहे. मध्य प्रदेश विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देईल. ज्यांना वाटतं की महाकालच्या चरणी गेल्यानं पाप धुतलं जाईल त्यांनी महाकालला ओळखलंच नाही. आमचं सरकार कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही. 

हे वाचा - कानपूर चकमकीनंतर कसे पळाले; विकास दुबेच्या सहकाऱ्याने दिली महत्वाची माहिती

अटकेनंतर विकास दुबे पोलिसांवरच अरेरावी करताना दिसला. त्याचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहे. यात दिसतं की पोलिस त्याला गाडीत बसवण्यासाठी नेत होते. तेव्हा दोन ते तीन पोलिसांनी विकासला पकडलं होतं. त्यावेळी विकास दुबे जोरात ओरडतो की, मीच विकास दुबे... कानपूर वाला. विकास ओरडत असताना एका पोलिसाने त्याच्या कानशिलात लगावली तेव्हा तो गप्प झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vikas dube travell from kota to ujjain on fake id name paul