व्हिंटेज कार-बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद ; अनुदानासाठी प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

गोव्यातील लोक हे वाहनप्रेमी असून, त्यांनी जुन्या काळातील कार व बाईकची चांगल्याप्रकारे जपणूक केली आहे. त्यांची वेळोवेळी दुरुस्ती करून त्या चालू स्थितीत ठेवण्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत.

 

पणजी : गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे पणजीत आयनॉक्‍सच्या परिसरात आयोजित केलेल्या गोवा व्हिंटेज कार व बाईक रॅलीला वाहनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोव्यात मोठ्या प्रमाणात जुन्या काळ्यातील गाड्या असून त्या सांभाळून ठेवण्यासाठी मालकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना अनुदान उपलब्ध करण्याचा प्रस्ताव सरकारकडे मांडणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष व आमदार निलेश काब्राल यांनी दिली. 

व्हिंटेज कार व बाईक रॅलीचे उद्‌घाटन आमदार निलेब काब्राल यांनी झेंडा दाखवून केले. यावेळी पर्यटन संचालक मिनिनो डिसोझा, महामंडळाचे व्यवस्थपाकीय संचालक निखिल देसाई, पणजी महापौर विठ्ठल चोपडेकर, गोवा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संघटनेचे साविओ माथायश व प्रदीप नाईक उपस्थित होते. या रॅलीसंदर्भात बोलताना आमदार काब्राला म्हणाले की, महामंडळाने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये गोमंतकीयच तर इतर राज्यातील वाहनप्रेमी आपापल्या जुन्या काळ्यातील गाड्या घेऊन सहभागी झाले आहेत.

गोव्यातील लोक हे वाहनप्रेमी असून, त्यांनी जुन्या काळातील कार व बाईकची चांगल्याप्रकारे जपणूक केली आहे. त्यांची वेळोवेळी दुरुस्ती करून त्या चालू स्थितीत ठेवण्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत. या वाहनांच्या जपणुकीसाठी त्यांना खर्च येतो. त्यामुळे सरकारतर्फे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रस्ताव मांडणार आहे. त्यामुळे अधिकाधिक गोमंतकीयांना आपल्या जुन्या गाड्या चालू स्थितीत व त्याची जपणूक करण्यास प्रोत्साहन मिळू शकेल, असे ते म्हणाले. 

या रॅलीमध्ये कार व बाईक मिळून सुमारे दोनशेहून वाहनमालकांनी भाग घेतला आहे. 1921 पासून ते आतापर्यंतच्या विविध कार व बाईक या रॅलीमध्ये प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. या गोवा व्हिंटेज कार व बाईक रॅलीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोव्याच्या कानाकोपऱ्यातून लोक वाहने पाहण्यासाठी जमा झाले आहेत. यामध्ये राज्यपालांसाठी वापरण्यात येणारी जुनी कार याचाही समावेश आहे.

बहुतेक व्हिंटेज कार व बाईक मालकांनी आपापल्या वाहनांची रंगरगोटी करून या रॅलीमध्ये आले होते. एकेकाळची लुना मोटरसायकलपासून हार्डली डेव्हडसन या वाहनांचा समावेश आहे. ही वाहने पाहण्यासाठी पालकांबरोबर मुलांनी उपस्थिती लावली होती. जुन्या काळातील कार व बाईक गोव्यातील अनेकांनी त्यांची योग्य तऱ्हेने निगा ठेवून जपल्या आहेत. 

या रॅलीच्या कार्यक्रमामुळे आयनॉक्‍सच्या परिसरात व्हिंटेज कार व बाईक पाहण्यासाठी आलेल्यांची गर्दी झाली आहे. अनेकजण या व्हिंटेज कार व बाईकसमोर 'सेल्फी' काढत होते. ही वाहने पाहण्यास मिळणे दुर्मिळ असल्याने वाहनप्रेमी वाहनांची छायाचित्रे तसेच स्वतःचे या वाहनासमोर उभे राहून सेल्फी फोटो काढत होते.

Web Title: Vintage Car Bike Rally Good Response Grants Proposal