विधेयकाविरोधात 'ईशान्य' पेटले; आसाममध्ये जनजीवन विस्कळित, त्रिपुरात नेट बंद 

विधेयकाविरोधात 'ईशान्य' पेटले; आसाममध्ये जनजीवन विस्कळित, त्रिपुरात नेट बंद 

गुवाहाटी : लोकसभेत मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात विविध राजकीय पक्ष, संघटना, नागरिकांनी आवाज उठविला असताना याचे खरे पडसाद ईशान्य भारतात पडलेले दिसत आहेत. या विधेयकामुळे संस्कृती नष्ट होण्याची भीती असल्याचा दावा करत येथील प्रभावशाली विद्यार्थी संघटनांनी आणि डाव्या संघटनांनी पुकारलेल्या 'बंद'मुळे ईशान्येकडील राज्यांमधील, विशेषत: आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळित झाले आहे. तर, त्रिपुरामध्ये इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे. 

आसाममध्ये निदर्शकांचे नेतृत्व ऑल आसाम स्टुडंट्‌स युनियन (आसु) आणि नॉर्थ ईस्ट स्टुडंट्‌स ऑर्गनायझेशन (नेसो) या संघटनांनी केले. या बंदमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. मालिगाव भागात निदर्शकांनी सरकारी बसवर दगडफेक केली आणि काही वाहने पेटवून दिली. सर्व बाजार, दुकाने, शाळा, सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या येथे शुकशुकाट होता. गुवाहाटीमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. हा मोर्चा सचिवालयाजवळ पोलिसांनी अडविल्यावर संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. दिब्रुगडमध्येही निदर्शकांचा पोलिसांबरोबर संघर्ष झाला. यामध्ये तीन पोलिस जखमी झाले. रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली होती. 

अरुणाचल प्रदेशात "नॉर्थ ईस्ट स्टुडंट्‌स ऑर्गनायझेशन'ने (नेसो) पुकारलेल्या 11 तासांच्या बंदमुळे सामान्य जनजीवन विस्कळित झाले होते. राज्यातील बहुतांशी शैक्षणिक संस्था, बॅंका, व्यापारी संकुले, बाजार आज बंद होता. वाहनांचीही वर्दळ नसल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. येथे सकाळी पाच वाजता सुरू होणाऱ्या सरकारी कार्यालयांमध्येही उपस्थिती जवळपास शून्य होती. "बंद' शांततेत पाळला गेला असला तरी काही ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक केली. 

ऑल मणिपूर स्टुडंट्‌स युनियनने मणिपूरमध्ये 15 तासांचा बंद पुकारला होता. हे विधेयक तातडीने मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या संघटनेने दिला आहे. भारतीय फुटबॉल टीमचे माजी कप्तान बायचुंग भुतिया यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातून सिक्कीमला न वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. 

तमीळ निर्वासितांचाही विचार करा 
नागरिकत्व विधेयकावरून वाद निर्माण झाला असताना आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेते गीतकार वैरामुथू यांनी तमीळ निर्वासितांनाही नागरिकत्व देण्याची मागणी केली आहे. भारतात गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून श्रीलंकेतून आलेले तमीळ निर्वासित राहत आहेत, त्यांचाही नागरिकत्व देण्याचा विचार करावा, अशी मागणी रविशंकर यांनी ट्विटरद्वारे केली आहे. तर वैरामुथू यांनी, या नागरिकांचा भूमी गमावलेले व्यक्ती या दृष्टिकोनातून विचार करावा, अशी मागणी केली आहे. 

- गुवाहाटी : नागरिकत्व विधेयकाचा निषेध म्हणून चित्रपट दिग्दर्शक जाहनू बारुआ यांनी आगामी आसाम चित्रपट महोत्सवातून त्यांचा "भोगा खिरीकी' हा चित्रपट मागे घेतला. 
- नवी दिल्ली : राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संस्थांची शहरात विविध ठिकाणी निदर्शने. ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांच्या संघटनांनी जंतरमंतरवर, तर डाव्या पक्षांनी संसदेच्या आवारात विधेयकाचा निषेध केला. 
- जवळपास एक हजार शास्त्रज्ञ आणि विचारवंतांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मागे घेण्याच्या निवदेनावर सह्या केल्या. विधेयकाला विरोध करणाऱ्यांमध्ये रामचंद्र गुहा, हर्ष मंदेर यांचा समावेश आहे. 
- निर्वासितांकडून आनंदोत्सव साजरा
- अफवांवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्रिपुरामध्ये इंटरनेट सेवा बंद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com