पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 14 मे 2018

राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पातळीवर 58 हजार 692 जागांपैकी 38 हजार 616 जागांसाठी मतदान सुरू आहे. बाकीच्या तब्बल 34.2 टक्के जागांवर पश्चिम बंगाल मधील तृणमुल काँग्रेस या सत्ताधारी पक्षाला बिनविरोध जागा मिळाल्या आहेत.

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये 20 जिल्ह्यांमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणूका सुरू आहेत. यावेळी विविध ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत असून, आत्तापर्यंत 6 जणांनी आपला जीव गमावला आहे.

आज (सोमवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली असून, मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत असल्याने हिंसाचारात आणखी वाढ होऊ शकते. काही ठिकाणी मतदानाचे बूथ ताब्यात घेण्याच्याही घटना घडल्या आहेत. साऊथ परगना 24 मध्ये तृणमुल कॉंग्रेसच्या (टीएमसी) कार्यकर्त्यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. तर बूथ नंबर 180 वर मतदारांना मतदानासाठी जाऊ दिले जात नसल्याने झालेल्या बॉम्ब हल्ल्यात मार्क्सवादी कम्यूनिस्ट पार्टीच्या (सीपीएम) कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. मुर्शिदाबाद येथे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) एका कार्यकर्त्यालाही जीव गमवावा लागला आहे. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत.

राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पातळीवर 58 हजार 692 जागांपैकी 38 हजार 616 जागांसाठी मतदान सुरू आहे. बाकीच्या तब्बल 34.2 टक्के जागांवर पश्चिम बंगाल मधील तृणमुल काँग्रेस या सत्ताधारी पक्षाला बिनविरोध जागा मिळाल्या आहेत.

निवडणूकीचे निकाल 17 मे ला जाहीर होणार आहेत. निवडणूकीच्या काळात सुरक्षेची खबरदारी म्हणून आसाम, ओडिसा, सिक्किम आणि आंध्र प्रदेशातून 1500 ची पोलिसांची फौज बोलविण्यात आली आहे. हे पोलिस दल मतदान सुरू असलेल्या अनेक ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. 
 

Web Title: violence that voted in west bengal