esakal | CAB : ईशान्येचा वणवा पश्‍चिम बंगालमध्ये; आंदोलकांकडून जाळपोळ
sakal

बोलून बातमी शोधा

CAB : ईशान्येचा वणवा पश्‍चिम बंगालमध्ये; आंदोलकांकडून जाळपोळ

- आंदोलकांकडून बस, रेल्वेची जाळपोळ

- विविध ठिकाणांवर रास्ता रोको

- ममतांचा कारवाईचा इशारा 

CAB : ईशान्येचा वणवा पश्‍चिम बंगालमध्ये; आंदोलकांकडून जाळपोळ

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

गुवाहाटी / कोलकता : "नागरिकत्व' कायद्यावरून ईशान्येमध्ये भडकलेल्या आंदोलनाचा वणवा अद्याप शमलेला नाही, याचे लोण आता प. बंगालसह राजधानी दिल्लीमध्येही पोचले आहे. ईशान्येकडील सहाही राज्यांतील अनेक भागांत संचारबंदी कायम असून तेथील इंटरनेट सेवाही बंद आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"ऑल आसाम स्टुडेंट्‌स युनियन'ने तीन दिवसांच्या सत्याग्रहाची घोषणा केली असून, नागालॅंडमध्ये "नागा स्टुडंट्‌स फेडरेशन'ने आज राज्यबंदची हाक दिली होती. प. बंगालमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढली असून, अनेक ठिकाणांवर बस, रेल्वेगाड्यांना आगी लावण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कायदा हातात घेणाऱ्या आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

आणखी वाचा - 'माफी मागायला माझं नावा राहुल सावरकर नाही'

दिल्लीत जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठामध्ये या कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 42 आंदोलकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या असून आता 16 डिसेंबर ते 5 जानेवारी या काळामध्ये विद्यापीठ बंद राहील. पश्‍चिम बंगालमध्ये अनेक भागांमध्ये लोकांनी बस, रेल्वेगाड्यांना आगी लावल्या. ऊलूबेरिया रेल्वे स्थानकावर पाच रिकाम्या गाड्या पेटविण्यात आल्या.

मुर्शिदाबाद आणि उत्तर- 24 परगणा जिल्हा, तसेच ग्रामीण हावडा येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. संतप्त आंदोलकांनी सार्वजनिक व खासगी अशा 15 बस पेटवल्या. आंदोलकांनी हावडा येथील एनएच- 6 आणि एनएच- 2 या कोलकत्याला जोडणाऱ्या दोन्ही महामार्गांवरील वाहतूक रोखली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. द्रुतगती मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. उत्तर आणि दक्षिण बंगालला जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे महामार्ग 34 मुर्शिदाबादमध्ये रोखण्यात आला होता. काल रात्रीपासून ग्रामीण हावडा येथील बगनान परिसरात वीस दुकाने पेटविण्यात आली आहेत.

हावडा जिल्ह्यातील संक्राईल रेल्वे स्थानकाच्या एका भागाला शेकडो निदर्शकांनी आग लावली. त्याठिकाणी असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनाही त्यांनी मारहाण केली. पूर्व रेल्वेच्या सियाल्ढा- हस्नाबाद भागातही रेल्वे गाड्या अडविण्यात आल्या. शोंडालिया आणि काक्रा मिर्झापूर स्थानकावरही "रेल-रोको' आंदोलन करण्यात आले. 

दिवसभरात...

ईशान्येत जाणाऱ्या पर्यटकांसाठी अमेरिकेच्या सूचना 
नागरिकत्व कायद्याविरोधात ओवेसी सर्वोच्च न्यायालयात 
आसाममध्ये 16 डिसेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार 
शिलॉंग येथे संचारबंदी काहीकाळ शिथिल राष्ट्रीय जनता दलाकडून 21 डिसेंबर रोजी बिहार बंद गुवाहाटीमध्ये संचारबंदी शिथिल, लोकांची दुकानांत धाव अलिगड मुस्लिम विद्यापीठामध्ये तणावपूर्ण स्थिती आसाममध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी विशेष रेल्वे सेवा 

विरोधक ईशान्येमध्ये हिंसाचाराला चिथावणी देत असून कॉंग्रेसने आधी तोंडी तलाक कायद्याला विरोध केला, आता आम्ही नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणला तर या लोकांच्या पोटामध्ये दुखत आहे. नवा कायदा हा मुस्लिमविरोधी नाही. 

- अमित शहा, गृहमंत्री 

लोकांनी कायदा हातात घेऊ नये, त्यांनी लोकशाही मार्गाने व शांततापूर्वक आंदोलन करावे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करू नये. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. 

- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्‍चिम बंगाल 

नागरिकत्व कायदा हा राज्यघटनेच्या विरोधात असून मध्यप्रदेशात तो लागू केला जाणार नाही. केंद्र सरकारने हा कायदा मंजूर करण्यापूर्वी राज्यांसोबत चर्चा करायला हवी होती. याबाबत कॉंग्रेस पक्ष जी भूमिका घेईल तीच आमचीही भूमिका असेल. 

- कमलनाथ, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश