काँग्रेस आमदार विश्वजित राणे भाजपच्या वाटेवर

अवित बगळे 
मंगळवार, 4 एप्रिल 2017

विश्वजित राणे  यांनी शनिवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. त्या भेटीनंतर त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला होता. सहज भेटायला आलो होतो असे मोघम उत्तर देत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला होता. भाजपमध्ये कधी प्रवेश करणार, मंत्रिमंडळात प्रवेश कधी? असे थेटपणे विचारल्यावर त्यांनी 'अजून काही ठरविले नाही' असे उत्तर दिले होते. 

पणजी : गोव्यात भाजपच्या आमदारांची संख्या आणखीन एकाने वाढणार आहे. वाळपईतून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन आमदारकीची शपथ घेतल्याच्या दोन तासांतच राजीनामा दिलेले विश्‍वजित राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

सध्या गोव्यात भाजपचे 13 आमदार आहेत. गोवा फॉरवर्डच्या तीन, 'मगो'च्या तीन आणि इतर तीन अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपने सरकार स्थापन केले आहे. भाजपने तडजोडीचे राजकारण फारकाळ करावे लागू नये म्हणून आपल्या आमदारांची संख्या वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार राणे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रविवारी गोव्यात येणार आहेत. त्यावेळी मात्र त्यांचा पक्ष प्रवेश होणार नाही. याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांना विचारले असता ते म्हणाले, "राणे भाजपमध्ये निश्‍चितपणे येतील. मात्र ते कधी येतील ते आताच सांगता येणार नाही. त्यांचा पक्षप्रवेश ठरला की निश्‍चितपणे सांगू."

राणे यांनी शनिवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची रात्री त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. त्या भेटीनंतर त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला होता. सहज भेटायला आलो होतो असे मोघम उत्तर देत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला होता. भाजपमध्ये कधी प्रवेश करणार, मंत्रिमंडळात प्रवेश कधी? असे थेटपणे विचारल्यावर त्यांनी 'अजून काही ठरविले नाही' असे उत्तर दिले होते. 

गोव्याच्या राज्यसभा सदस्याची मुदत येत्या जुलैमध्ये संपते. सध्या कॉंग्रेसचे शांताराम नाईक हे राज्यसभा सदस्य आहेत. त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांना राज्यसभेवर पाठविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. ते भाजपमध्ये आल्यास त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचीही भाजपने तयारी केल्याची माहिती मिळाली आहे. ते सध्या पर्येचे आमदार आहेत. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पर्येतून विश्‍वजित यांची पत्नी डॉ. दिव्या राणे भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढू शकतात. त्यामुळे भाजप आमदारांची संख्या 15 वर पोचू शकते. 
प्रतापसिंह राणे यांनी मात्र तूर्त यावर काहीही खुलेपणे सांगण्यास नकार दिला आहे. त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, "मी अनेक वर्षे कॉंग्रेसमध्ये आहे आणि कॉंग्रेसमध्येच राहणार आहे. विश्‍वजित यांना त्यांच्या राजकीय भवितव्याचे निर्णय त्यांनाच घेऊ द्यावे या मताचा मी आहे."

राणेंची 'हात'चलाखी; भाजपला साथ? 
भाजपच्या मनोहर पर्रीकर सरकारविरोधात मतदान करण्याचा पक्षादेश (व्हिप) धुडकावल्यावर आमदार विश्वजित राणे यांच्यावर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारण्यापूर्वी त्यांनीच आमदारकीचा राजीनामा दिला होता. 

Web Title: vishwajit rane to join bjp, time undecided