गुजरातमध्ये "व्हीव्हीपॅट'चा वापर होणार का? 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 सप्टेंबर 2017

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर बहुजन समाज पक्ष आणि कॉंग्रेसनेही इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला होता.

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीतील खडाजंगीनंतर कॉंग्रेसने आता गुजरातमधील मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष देण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातमध्ये मतदानावेळी "व्हीव्हीपॅट'चा वापर होणार आहे की नाही, अशी विचारणा कॉंग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर बहुजन समाज पक्ष आणि कॉंग्रेसनेही इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर गुजरातमध्ये उत्तर प्रदेशातील मतदान यंत्रांच्या संभाव्य वापरावरून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल, कॉंग्रेसच्या निवडणूक समितीचे प्रभारी मधुसूदन मिस्त्री, मध्य प्रदेशचे प्रभारी दीपक बाबरिया, मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि इतर काही नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली. 

सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीत निवडणूक आयोगाने भविष्यातील सर्व निवडणुकांसाठी मतदानाच्या नोंदीची पावती देणाऱ्या "व्हीव्हीपॅट' यंत्राचा वापर करण्याची दिलेली ग्वाही आणि सर्वोच्च न्यायालयानेही या संदर्भात आदेश दिला असल्याचे कॉंग्रेसने निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये वापरली गेलेली इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे गुजरातमध्ये मतदानासाठी पाठविली जाणार असल्याची चर्चा आहे. ही बाब चिंताजनक असल्याने निवडणूक आयोगाने खुलासा करावा आणि गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा उपयोग होणार आहे किंवा नाही याचेही स्पष्टीकरण आयोगाने द्यावे, अशी मागणी कॉंग्रेसने केली. 

 

Web Title: VVPAT use in upcoming gujrat election