डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर सरकार चालते : पंतप्रधान

वृत्तसंस्था
बुधवार, 4 एप्रिल 2018

राजकीय फायद्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा कोणीही वापर करत आहे. आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने जे केले नाही तितके आम्ही आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी केले. 

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली : अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर दलितांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार माजला. या हिंसाचारामुळे देशभरात विविध ठिकाणी प्रचंड तणाव निर्माण झाला. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर प्रथमच भाष्य केले. ते म्हणाले, ''दलितांचे आदर्श असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर सरकार चालत आहे''.  

'वेस्टर्न कोर्ट एनेक्सी' भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने अट्रॉसिटीबाबत दिलेल्या निकालावरून देशभरात प्रचंड हिंसाचार माजला होता. त्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधानांनी यावर आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, ''देशाचे संविधान ज्यांनी निर्माण केले अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान जितका यापूर्वीच्या सरकारने कधी केला नाही, त्याहीपेक्षा आमच्या सरकारने केला. देशातील अत्यंत गरीब जनतेसाठी काम करणे हे आमच्या सरकारचे ध्येय आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ सुरु केलेली योजना पूर्णत्वास नेण्यास आमचे सरकार प्रयत्नशील आहे. 

ते पुढे म्हणाले, राजकीय फायद्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा कोणीही वापर करत आहे. आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने जे केले नाही तितके आम्ही आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी केले. 

Web Title: walking on the path shown by Dr Babasaheb Ambedkar says Prime Minister Narendra Modi