धर्माच्या नावाखाली द्वेषाच्या भिंतींची उभारणी: नसीरुद्दीन शाह

वृत्तसंस्था
शनिवार, 5 जानेवारी 2019

मुस्कटदाबी होते 
आता अधिकारांची मागणी करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात असून कलाकार, अभिनेते, विद्वान आणि कवींची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत आहे. पत्रकारांनादेखील शांत राहायला भाग पाडले जात आहे. सध्या देशामध्ये द्वेषाचा आणि क्रौर्याचा महापूर आला आहे. अन्यायाला वाचा फोडणाऱ्यांच्या कार्यालयांवर छापे घातले जात असून, त्यांचे परवाने रद्द केले जात आहेत, त्यांची बॅंक खातीदेखील गोठविली जात असून, त्यांना गप्प केले जात आहे. त्यामुळेच काही मंडळी सत्य बोलायला घाबरत असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली : ज्येष्ठ सिनेअभिनेते आणि विचारवंत नसीरुद्दीन शाह यांनी पुन्हा एकदा देशातील वाढत्या हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. कलाकार, अभिनेत्यांची मुस्कटदाबी केली जात असून, पत्रकारांनादेखील शांत राहण्यास भाग पाडले जात आहे. धर्माच्या नावावर द्वेषाच्या भिंती उभ्या केल्या जात असून, निष्पाप लोकांना ठार मारले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

"ऍमनेस्टी इंडिया'ने शाह यांचा दोन मिनिटे चौदा सेकंदांचा व्हिडिओ आज प्रसिद्ध केला असून, यामध्ये शाह हे भारतीय राज्यघटनेचा स्वीकार आणि गरिबांच्या शोषणावर चिंता व्यक्त केली आहे. शाह यांनी म्हटले आहे की, ""26 जानेवारी 1949 रोजी आपण राज्यघटनेचा स्वीकार केला. सुरवातीपासूनच राज्यघटनेच्या मुख्य मूल्यांनी सर्वांनाच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळावा यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. सर्वांनाच विचाराचे, व्यक्त होण्याचे आणि आपापल्या धर्मश्रद्धांचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. सर्वांना समान वागणूक दिली जावी, सर्वांच्या जीवन जगण्याच्या अधिकाराचा आदर ठेवला जावा. आपल्या देशामध्ये गरिबांची घरे, जमिनी आणि त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणारे, केवळ जबाबदाऱ्याच नाही तर अधिकारांवर भाष्य करणारे आणि भ्रष्टाचाराविरोधात आपला आवाज बुलंद करणारे राज्यघटनेचे संरक्षक आहेत.'' 

मुस्कटदाबी होते 
आता अधिकारांची मागणी करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात असून कलाकार, अभिनेते, विद्वान आणि कवींची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत आहे. पत्रकारांनादेखील शांत राहायला भाग पाडले जात आहे. सध्या देशामध्ये द्वेषाचा आणि क्रौर्याचा महापूर आला आहे. अन्यायाला वाचा फोडणाऱ्यांच्या कार्यालयांवर छापे घातले जात असून, त्यांचे परवाने रद्द केले जात आहेत, त्यांची बॅंक खातीदेखील गोठविली जात असून, त्यांना गप्प केले जात आहे. त्यामुळेच काही मंडळी सत्य बोलायला घाबरत असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Walls Of Hatred In Name Of Religion says actor Naseeruddin Shah