गुजरातबरोबरचा करार फाडणार : भुजबळ 

गुजरातबरोबरचा करार फाडणार : भुजबळ 

नाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास कराराचे कागद फाडून टाकू. गुजरातला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानच्या तावडीतून सोडल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतील, तर गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव का सुटत नाहीत, असा प्रश्‍न करत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, की मी पालकमंत्री असताना नाशिकमध्ये एक खून झाला, तर माझ्या नावाने ओरड व्हायची. आता रोज खून, दरोडे पडत असताना मात्र आवाज गायब झाला. सोळाव्या स्थानी असलेले नाशिक ऑक्‍सफोर्ड इकॉनॉमिकच्या अहवालातून गायब झाले. स्मार्ट शहरांच्या यादीत नाशिकचा क्रमांक घसरला. नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून दिला; परंतु आता पुन्हा सर्वेक्षणाचे नाटक उभे केले. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सैन्याच्या शौर्याचे राजकारण केले जात आहे. भाजपच्या सत्ताकाळात शेतकरी आत्महत्या करताहेत. सर्वाधिक दहशतवादी हल्ले या सरकारच्या काळात झाले. सरकारच्या निर्णयाला शिवसेनाही जबाबदार आहे. 

अडचणीच्या काळात शरद पवार खंबीरपणे उभे राहिले. तुरुंगात असताना पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले नसते, तर जिवंत बाहेर आलो नसतो, असा दावा करताना भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कितीही धमकी दिली, तरी आवाज दबला जाणार नसल्याचा इशारा दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com