निव्वळ 'काँग्रेस'ला दोष देणे आता थांबवा: यशवंत सिन्हा

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

भारताची अर्थव्यवस्था सध्या उतरणीला लागली आहे. मात्र यासाठी आपण याआधीच्या सरकारला दोष देऊ शकत नाही. या सरकारलाही पुरेसा वेळ व संधी मिळाली आहे

नवी दिल्ली - देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीस याआधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) नेतृत्वाखालील सरकारला जबाबदार धरता येणार नाही, असा नवीन हल्ला भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी चढविला आहे.

सिन्हा यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सध्याचे केंद्र सरकार व विशेषत: अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केले आहे. जेटली यांच्या धोरणांमुळे देशातील जनतेस लवकरच गरिबी पहावी लागेल, असा थेट हल्ला सिन्हा यांनी चढविल्यामुळे खळबळ उडाली होती. आज (गुरुवार) सिन्हा यांनी टीकेचा हा सूर कायम ठेवत याआधीच्या सरकारला दोष देणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

"भारताची अर्थव्यवस्था सध्या उतरणीला लागली आहे. मात्र यासाठी आपण याआधीच्या सरकारला दोष देऊ शकत नाही. या सरकारलाही पुरेसा वेळ व संधी मिळाली आहे,'' असे सिन्हा म्हणाले. सिन्हा यांना यावेळी त्यांनी काल (बुधवार) लिहिलेल्या लेखाबद्दल विचारणा करण्यात आली आहे. "भारताची अर्थव्यवस्था गेल्या काही काळापासून उतरणीला लागली आहे; मात्र मी याआधी बोललो नव्हतो,' असे त्यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना सांगितले.

"भारताची अर्थव्यवस्था घसरते आहे, हे माझे मत केवळ एका तिमाहीच्या आकडेवारीवरुन बनविलेले नाही. गेल्या सलग सहा तिमाहींमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये घसरण झालेली दिसून आली आहे. प्रगतीचा वेग मंदाविण्यामागील सर्वांत मोठे कारण म्हणजे अर्थातच नोटाबंदी होय. नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर, रोजगारावर होणाऱ्या परिणामांचा आधी अभ्यास केला जाणे आवश्‍यक होते. याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असतानाच ही सुधारणा राबविली जाणे अपेक्षित होते,'' असे सिन्हा म्हणाले.

जेटलींनी वाट लावली
देशाच्या अर्थव्यवस्थेची जेटली यांनी जी अवस्था करून ठेवलीय, त्यावर मी आता बोललो नाही तर ते माझ्या देशाशी प्रतारणा केल्यासारखे होईल. परंतु, मी जे बोलतोय त्याच्याशी भाजपमधील अनेक नेते सहमत होतील, हे मला माहिती आहे. भीतीमुळे ते नेते बोलत नाहीत. खासगी गुंतवणुकीत जितकी घसरण झालीय, तितकी गेल्या दोन दशकात झालेली नाही. औद्योगिक उत्पन्नाची स्थिती बिकट आहे, कृषी क्षेत्रातही समस्या वाढल्यात. रोजगार उपलब्ध करणारे उद्योगधंदेही संकटात आहेत. नोटाबंदी पूर्णपणे अयशस्वी झाली आहे. त्याचवेळी, जीएसटी लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भयावह स्थिती आहे. लाखो लोक बेरोजगार होत आहे, असं सिन्हा यांनी नुकत्याच लिहिलेल्या या लेखात नमूद केलं आहे. 

Web Title: 'We can't blame UPA for declining economy, we had enough chance,' says Yashwant Sinha