देशातील दलालांची दुकाने बंद : पंतप्रधान

वृत्तसंस्था
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

केंद्र सरकारकडून कृषी क्षेत्रात बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले आहेत. 

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली : काळा पैसा आणि भ्रष्टाचाऱ्यांना माफ करणार नाही. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. भ्रष्टचारी अधिकाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (बुधवार) सांगितले. तसेच देशातील दलालांची दुकानेही बंद पाडली आहेत, असेही मोदी म्हणाले.

72 व्या स्वांतत्रदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ला येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाच्या जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. 

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे : 

- तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यादृष्टीने आम्ही कायदा करत आहोत. मात्र, यासाठी काही लोकं विरोध करत आहेत.

- मी मुस्लिम महिलांना आश्वासन देतो, की हा कायदा होणारच.

- महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशा राक्षसीवृत्तीतून मुक्त देशाला करायचे आहे.

- आगामी काळात ग्रामस्थांनाही महत्त्वाचे अधिकार मिळणार आहेत. तिथे पंचायत आणि महापालिका निवडणुका होतील, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

- मुद्रा योजनेंतर्गत देशातील 13 कोटी लोकांना मुद्रा कर्ज देण्यात आले आहे. यातील 4 कोटी लोकांनी पहिल्यांदाच कर्ज घेतले. त्यामुळे यातून देशातील बदल दिसून येत आहे.

- केंद्र सरकारकडून कृषी क्षेत्रात बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले आहेत. 

- 2022  पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल.

- देशाकडे आज आत्मविश्वास आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करून देश यशाचे शिखर गाठत आहे.

- आजचा दिवस देशात एक नवीन उत्साह घेऊन आला आहे. 

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हुतात्मा जवानांना नमन करतो, अशा शब्दांत त्यांचे स्मरण केले. तसेच महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांचे मोदींनी कौतुक केले. या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकवून देशाची शान वाढवली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Web Title: we stopped agents shops says PM Modi