आपण दोघेही समसमान माघारी घेऊ; चीनचा भारतासमोर नवा प्रस्ताव

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 23 August 2020

भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सीमावादावरून तणाव आहे.

नवी दिल्ली- लडाखमधील फिंगर पॉइंट भागातून दोन्ही बाजूंनी सारखीच माघारी घ्यावी, हा चीनचा प्रस्ताव भारताने फेटाळून लावला आहे. भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सीमावादावरून तणाव आहे. हा तणाव दूर करण्यासाठी राजनैतिक तसेच लष्करी पातळीवरही प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून फिंगरपॉइंट - ४ भागातून दोन्ही देशांनी सारखीच माघारी घ्यावी असा प्रस्ताव चीनने ठेवला होता. भारताने तो अमान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मोठी बातमी : कोविडची लस ७३ दिवसांत येणार नाही; वाचा सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा

चिनी सैन्य सध्या पँगाँग सरोवराच्या परिसरातील फिंगर पॉइंट- ५च्या भागात आहे. तेथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर लष्करी जमवाजमव केली आहे. फिंगर पॉइंट ५ ते फिंगर पॉइंट ८ असा सुमारे पाच किलोमीटरचा हा भाग आहे. या भागाच्या मागेही या वर्षी एप्रिल-मे महिन्यापर्यंत चीनचा तळ होता. चीनने फिंगर पॉइंट भागातून पूर्णपणे माघार घ्यावी आणि त्यांच्या मूळच्या जागी जावे असे भारताने स्पष्ट केले आहे. 

दोन्ही देशांमध्ये १९९३ ते १९९६ या कालावधीतील करारांचे चीन उल्लंघन करत असल्याचा मुद्दा भारताने सातत्याने मांडला आहे. तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भागात कोणतेही बांधकाम न करण्याच्या कराराचेही चीनकडून उल्लंघन होत असल्याचे भारताने निदर्शनास आणून दिले आहे. फिंगरपॉइंट ८पर्यंत भारताचा भाग आहे. त्या भागातही चीनने बांधकाम केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे चीनने पूर्ण माघार घ्यावी अशीच भारताची भूमिका असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

 

काँग्रेसमध्ये फुटलेला 'लेटर बॉम्ब' काय आहे? वाचा राहुल, प्रियंका...

चीनची अव्यवहार्य मागणी 

चीनचे सैन्य सध्या फिंगर पॉइंट ४ ते ८च्या दरम्यान आहे. ते सैन्य फिंगर पॉइंट ८च्या मागे जावे अशी भारताची मागणी आहे. परंतु, भारताने फिंगर पॉइंट १ पासून मागे हटावे अशी चीनची मागणी आहे. वास्तविकतः भारताचे सैनिक फिंगर पॉइंट १ ते ८ या दरम्यान गस्त घालत असतात. म्हणजेच आपल्याच सीमेतून भारताला मागे ढकलण्याचा चीनचा डाव आहे. भारताने त्याला नकार दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will both withdraw equally China proposal to India

Tags
टॉपिकस
Topic Tags: