Chandrayaan 2 : पंतप्रधान म्हणतात, 'नवी पहाट उगवेल'

वृत्तसंस्था
Sunday, 8 September 2019

सर्वोत्तम कार्य अजून घडायचे आहे. नवी क्षितिजे पादाक्रांत करायची आहेत. नव्या ठिकाणांवर आपल्याला जायचे आहे. संपूर्ण भारत शास्त्रज्ञांसोबत आहे.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी 

बंगळूर : ‘‘चांद्रयान २ मोहिमेत आलेल्या अडथळ्यांमुळे निरुत्साहित होऊ नका. नवी पहाट उगवेल आणि उज्ज्वल भविष्यकाळसमोर येईल,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इस्रो’तील शास्त्रज्ञांशी आज संवाद साधला. 

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पाठविलेल्या चांद्रयान २मधील विक्रम लँडरशी असलेला संपर्क आज पहाटे लँडर चंद्रावर उतरण्यापूर्वी काही क्षण तुटला. त्यामुळे मोहिमेला धक्का बसला. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ‘इस्रो’च्या मुख्यालयातून देशाला उद्देशून भाषण केले. त्यात त्यांनी शास्त्रज्ञांच्या कार्याचा गौरव केला व अडथळ्यांमुळे खचून न जाण्याचा सल्ला त्यांना दिला. 

मोदी म्हणाले, ‘‘आपण आपल्या लक्ष्याच्या अत्यंत जवळ आलो होतो. परंतु येत्या काळात इप्सित साध्य करण्यासाठी आपल्याला आणखी प्रयत्न करावे लागतील. आजच्या घटनेतून बोध घेऊन आपण अधिक शक्तिशाली होऊया. संपूर्ण देशाला आपल्या अवकाश कार्यक्रमाचा आणि शास्त्रज्ञांचा अभिमान आहे.’’ 

‘‘चांद्रयान २ च्या मोहिमेदरम्यान देश अनेकदा आनंदीत झाला आहे. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक आहे. विज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण करून देतात. चांद्रयान २ च्या अंतिम टप्प्याचा प्रवास आपल्या अपेक्षेनुसार झाला नाही, मात्र चांद्रयानाचा संपूर्ण प्रवास अतिशय उत्तम होता,’’ असे मोदी म्हणाले. 

मोदींनी सुमारे २५ मिनिटांचे भाषण केले. तत्पूर्वी पहाटे त्यांनी विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया ‘इस्रो’च्या मुख्यालयात उपस्थित राहून अनुभवली. भाषणाची सुरवात त्यांनी भारत माता की जय या घोषणेने केली. 

‘‘चांद्रयान २च्या अंतिम टप्प्याचा प्रवास अपेक्षेप्रमाणे झाला नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या मनात काय चालले आहे, हे तुमच्या डोळ्यांतून ते स्पष्टपणे जाणवते आहे. तुमच्या चेहऱ्यावरील निराशा सर्व काही सांगून जात आहे. तुमच्या बरोबरीने मीही ते क्षण अनुभवले आहेत. त्यामुळेच मी पहाटे फारवेळ थांबलो नाही. आता सकाळी मी पुन्हा आलो आहे तो तुम्हाला उपदेश देण्यासाठी नाही, तर प्रोत्साहन देण्यासाठी,’’ असे मोदी म्हणाले. 

ते म्हणाले, ‘‘निराशाजनक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. परंतु आपण आपले प्रयत्न सोडून दिलेले नाहीत. आपले प्रयत्न कौतुकास्पद आहेत तसाच आतापर्यंतचा प्रवासही. या घटनेमुळे चंद्राला स्पर्शिण्याची इच्छा आता अधिक तीव्र झाली आहे.’’ 
‘‘ज्ञान मिळविण्यासाठीचा सर्वांत मोठा शिक्षक जर कुणी असेल तर तो आहे विज्ञान. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग आणि प्रयत्न असतो. कधीही हार न मानणाऱ्या आपल्या संस्कृतीचे इस्रोनं जतन केले आहे. मी कालही म्हटले होते, आणि आजही म्हणतो की, मी तुमच्या सोबत आहे. देश देखील आपल्या सोबत आहे. तुम्हा सर्वांना पुढील सर्व मोहिमांसाठी खूप खूप शुभेच्छा.’’ 

तुम्ही दह्यावर नव्हे तर दगडावर अमीट ठसा उमटवणारे लोक आहात असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचा गौरव केला. ‘‘भारतीय शास्त्रज्ञांनी देशासाठी अमूल्य योगदान दिले आहे. चांद्रयान २ साठी संपूर्ण चमूने प्रचंड परिश्रम घेतले आहेत. या मोहिमेशी संबंधित सर्व जण धेय्याने झपाटलेले होते. आता चंद्रावर जाण्याचे आपले स्पप्न अधिक प्रबळ झाले आहे,’’ असे पंतप्रधान म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will get Success soon says PM Modi on Chandrayaan 2