मुख्यमंत्री होताच बहुमत सिद्ध करू - कुमारस्वामी

यूएनआय
रविवार, 20 मे 2018

कर्नाटकातील सत्तेच्या रेसमध्ये भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा औटघटकेचे राजे ठरल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाच्या सिंहासनावर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते (जेडीएस) नेते एच. डी. कुमारस्वामी विराजमान होणार आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चोवीस तासांमध्ये आपण बहुमत सिद्ध करू, असे त्यांनी म्हटले आहे. 

बंगळूर - कर्नाटकातील सत्तेच्या रेसमध्ये भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा औटघटकेचे राजे ठरल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाच्या सिंहासनावर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते (जेडीएस) नेते एच. डी. कुमारस्वामी विराजमान होणार आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चोवीस तासांमध्ये आपण बहुमत सिद्ध करू, असे त्यांनी म्हटले आहे. 

येथील कांतिरवा स्टेडियमवर 23 मे रोजी कुमारस्वामी यांचा शपथविधी पार पडणार असून, राज्यपाल वजूभाई वाला त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. कुमारस्वामी यांनी या शपथविधी समारंभासाठी पश्‍चिम बंगाल, तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनाही आमंत्रित केले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि "यूपीए'च्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना वैयक्तिक निमंत्रण देण्यासाठी कुमारस्वामी स्वत: दिल्लीला जाणार आहेत. नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेबाबत कुमारस्वामी सध्या कॉंग्रेस नेतृत्वाशी चर्चा करत आहेत. दरम्यान, बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच येडियुरप्पा यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

देवेगौडांचे आशीर्वाद 

सत्तास्थापनेबाबत रविवारी मध्यरात्रीच कॉंग्रेस नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर आज सकाळी कुमारस्वामी यांनी माजी पंतप्रधान आणि त्यांचे पिताश्री एच. डी. देवेगौडा यांची निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. ज्येष्ठ कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेस-"जेडीएस' आघाडी ही 2019 ची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरही कायम राहील, असे म्हटले आहे.

Web Title: we will prove majority when becomes CM says Kumaraswamy