कुलभूषण जाधव यांचे पार्थिवच पाठवू: पाक हॅकर्स

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

आम्ही तुमची साईट का हॅक केली माहिती आहे का? तुम्हाला कुलभूषण जाधव परत हवे आहेत, हे शक्य नाही. आम्ही त्यांचे पार्थिव लवकरच पाठवू. तुम्हाला स्नॅपडील आणि स्नॅपचॅटमधील फरक कळत नाही अन् जाधव यांच्या सुटकेची मागणी करत आहात.

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानी हॅकर्सकडून अखिल भारतीय फुटबॉल संघटनेची (एआयएफएफ) वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. या साईटवर आम्ही कुलभूषण जाधव यांचे पार्थिवच भारतात पाठवू असा संदेश देण्यात आला आहे.

हेरगिरीच्या आरोपावरून नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कुलभूषण जाधव नौदलातून निवृत्त झाल्यानंतर व्यवसायानिमित्त इराण येथे गेले होते, तेथून त्यांचे अपहरण करण्यात आले होते, अशी बाजू भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडली होती. पाकिस्तानने हेरगिरीप्रकरणी अटक करून त्यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला चालविला. न्यायालयाने त्यांना या प्रकरणी दोषी धरत गेल्या महिन्यात फाशीची शिक्षा सुनावली होती. यावर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.

त्यानंतर आज एआयएफएफची वेबसाईट हॅक करून जाधव यांच्याबाबत संदेश लिहिला. एआयएफएफने तांत्रिक कारणामुळे वेबसाईट बंद असल्याचे सुरवातीला ट्विट केले होते. पण, नंतर साईट हॅक झाल्याचे त्यांना कळाले व त्यावर आक्षेपार्ह संदेश दिल्याचेही स्पष्ट झाले. हॅकरने लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे, की आम्ही तुमची साईट का हॅक केली माहिती आहे का? तुम्हाला कुलभूषण जाधव परत हवे आहेत, हे शक्य नाही. आम्ही त्यांचे पार्थिव लवकरच पाठवू. तुम्हाला स्नॅपडील आणि स्नॅपचॅटमधील फरक कळत नाही अन् जाधव यांच्या सुटकेची मागणी करत आहात.

Web Title: We will send you Kulbhushan Jadhav's dead body': Hackers post message from AIFF's official website