शस्त्र परवाना पाहिजे, मग 10 झाडे लावा; पर्यावरण रक्षणासाठी ठेवली भन्नाट अट

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 26 August 2020

नव्याने शस्त्र परवाना हवा असेल किंवा परवान्याचे नुतनीकरण करायचे असेल तर वृक्षारोपण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

लुधियाना- नव्याने शस्त्र परवाना हवा असेल किंवा परवान्याचे नुतनीकरण करायचे असेल तर वृक्षारोपण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लुधियानाचे विभागीय आयुक्त चंदर गैंद यांनी ‘ट्री फॉर गन’ ही योजना कार्यान्वित केली आहे. अशा प्रकारची योजना राबवणारे लुधियाना पंजाबमधील चौथे शहर बनले आहे. त्यांनी यापूर्वी फिरोजपूर, पतियाळा आणि संगरुर शहरात योजना राबविली आहे. विशेष म्हणजे झाडे लावल्याचे पुरावे देखील प्रशासनाला द्यावे लागणार आहे. पुरावे दिल्यानंतरच परवान्याची फाइल हलणार आहे. 

नीट-जेईई परीक्षांचा मुद्दा ते अमेरिकेतील पेटलेलं आंदोलन; दिवसभरातील महत्वाच्या...

शस्त्र परवाना नव्याने हवा असेल तर दहा रोपट्यांची आणि परवाना नुतनीकरण करायचा असेल तर पाच रोपट्यांची लागवड करावी लागणार आहे. वृक्षारोपण करतानाचे फोटो देखील परवान्याच्या फाइलला जोडावे लागणार आहेत. एक महिन्यानंतर पुन्हा झाडांची स्थिती कळवावी लागणार आहे. त्यानंतरच अर्जदाराची फाइल मंजूर होण्याचा मार्ग मोकळा होईल. एक महिन्यानंतर झाडांची स्थिती समजल्यानंतर अर्जदाराची डोप टेस्ट, पोलिस पडताळणी आणि अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाईल. 

चंदर गैंद म्हणाले, की सध्या पर्यावरणाची स्थिती चिंताजनक बनली आहे. झाडांची कत्तल होत आहे. पाण्याची पातळी देखील घसरत चालली आहे. पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी त्यांनी फिरोजपूर जिल्ह्यातून सुरवात केली होती. या योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहून पतियाळा आणि संगरुर जिल्ह्यातही त्याची अंमलबजावणी करण्यात आली. 

खळबळजनक! भारताच्या ब्राँज पदक विजेत्यानं पत्नीसह आईचा केला खून

लुधियानात ३२ हजार परवाने 

अन्य ठिकाणी मिळालेला प्रतिसाद पाहता लुधियाना येथे ट्री फॉर गन योजनेला प्रारंभ केला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३२,१११ परवाने देण्यात आले आहेत. दरवर्षी सुमारे २३० परवाने दिले जातात आणि दहा हजारापेक्षा अधिक परवान्यांचे नूतनीकरणाचे प्रस्ताव येतात. या हिशोबाने दरवर्षी जिल्ह्यात ५३,४२५ रोपट्यांची लागवड करता येणे शक्य आहे, असे गैंद यांचे म्हणणे आहे. ही योजना औद्योगिकनगरीसाठी उपयुक्त ठरू शकते. जर ही योजना राज्यात राबवली तर दरवर्षी २,६४ लाख वृक्षारोपण होईल. काही वर्षातच पंजाबचे चित्र बदलू शकते. यानुसार देशातील ७३६ जिल्ह्यात या योजनेचा अंमल झाला तर दरवर्षी एक कोटीहून अधिक वृक्षारोपण होईल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weapons should be licensed when plant ten trees condition for environmental protection