
राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालंय.
Weather Update : महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी; 'या' राज्यांत पुढील 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता
Weather Update News : भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department IMD) पुढील काही दिवसांत महाराष्ट्र (Maharashtra) आणि उत्तराखंडसह (Uttarakhand) देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलीय. IMD नं या राज्यांच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. याशिवाय, पुढील पाच दिवस गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवलीय.
हवामान विभागानं (IMD) मुंबई (Mumbai), ठाणे आणि सिंधुदुर्गसह महाराष्ट्राच्या काही भागांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केलाय. हवामान विभागानं उत्तराखंडमधील गढवाल आणि कुमाऊं प्रदेशातील विविध भागात मुसळधार ते अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केलाय. उत्तराखंडच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळं महामार्ग आणि निवासी वसाहती जलमय झाल्या आहेत.
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन-तीन दिवसांत राजस्थानच्या अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 13-15 सप्टेंबर या कालावधीत कोटा, जयपूर, उदयपूर आणि भरतपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. स्कायमेट हवामानानुसार, पुढील 24 तासांत पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनार्यावर मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय बिहार, झारखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, कर्नाटक, केरळ, उत्तराखंड आणि तेलंगणाच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.