'जय श्री राम'च्या घोषणा देत तृणमूलच्या खासदाराचा भाजप प्रवेश

BJP
BJP

नवी दिल्ली- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. त्यांच्या पक्षातील अनेक बडे नेते दूर जाताना दिसत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेपासून ममता बॅनर्जी यांच्यासोबत असणारे सिसिर अधिकारी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपप्रवेशाची चाहूल याआधीच लागली होती. सिसिर अधिकारी हे भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे वडील आणि तृणमूलचे खासदार आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे ममतादीदींना मोठा झटका बसला आहे. सिसिर अधिकारी म्हणाले की, 'मिदनापूरचा सन्मान वाचवण्यासाठी मी आलो आहे. मला नेहमीपासून ताजपूर बंदर हवं होतं, पण राज्य सरकार याला पूर्ण होऊ न देण्यासाठी प्रयत्न करत होते. माझे परिवार भाजपसोबत आहे. मी सगळ्यांच्या चांगल्यासाठी प्रार्थना करतो. 'जय श्री राम, वंदे मातरम'.' एका हिंदी वृत्त माध्यमाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

सिसिर अधिकारी यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत त्यांचे पुत्र सुवेंदु अधिकारी यांनी दिली होते. गृहमंत्री अमित शहा यांच्या 21 मार्चला होणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 24 मार्चला होणाऱ्या रॅलीसाठी सिसिर अधिकारी उपस्थित राहतील असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर ते हातात कमळ घेतील अशी जोरदार चर्चा सुरु झाली होती. अखेर त्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. सिसिर अधिकारी ममतादीदींचे जूने सहकारी आहेत. ते गेल्या काही दिवासांपासून पक्षावर नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. 

अमित शहा यांच्या रॅलीत सामिल होण्यासाठी सिसिर अधिकारी यांना भाजपने निमंत्रण पाठवलं होतं. भाजप नेते मनसुख मांडविया सिसिर अधिकारी यांना अमित शहांची आज होणारी रॅली आणि 24 मार्चला पंतप्रधान मोदी यांच्या होणाऱ्या रॅलीसाठी निमंत्रण देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. सिसिर अधिकारी यांनी सभेत सामिल होण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. अखेर त्याला पुष्टी मिळाली आहे.  

पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चपासून पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरुवात होणार आहे. सिसिर अधिकारी, नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांना आव्हान देणाऱ्या सुवेंदु अधिकारी यांचे वडील आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. दिब्येंदु अधिकारी यांचे मोठे बंधू सुवेंदु अधिकारी यांनी मागील वर्षी अमित शहांच्या रॅलीदरम्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सौम्येंदु अधिकारी यांनीही टीएमसी सोडत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सिसिर अधिकारी हेही भाजपमध्ये गेलेत. त्यामुळे संपूर्ण अधिकारी कुटुंब भाजपवासी झाल्याचे चित्र आहे.  सुवेंदु अधिकारी ममतादीदी यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होईल, असं सांगितलं जातंय.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com