मिथुन चक्रवर्ती खरंच नक्षलवादी होते का? जाणून घ्या कसा राहिलाय त्यांचा प्रवास

mithun chakrabortyl
mithun chakrabortyl

बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मिथुन यांचा भाजपप्रवेश अनेक अर्थाने वेगळाय. कारण, मिथुन चक्रवर्ती अशा मोजक्या कलाकारांपैकी आहेत, ज्यांचा प्रवास कट्टर डाव्या संघटनांकडून उजव्या संघटनांकडे झालाय. एक काळ होता जेव्हा मिथुन चक्रवर्ती नक्षलवादी विचारधारेशी जोडले गेले होते. सगळ्यांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण व्हाव्यात अशा समानतेवर आधारेल्या जगाचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. पण एका घटनेनं त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 

१६ जूलै १९५० मध्ये जन्मलेल्या मिथुन यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मिथुन यांना लहानपणी बॉक्सिंगची आवड होती. १९६० च्या दशकात त्यांच्यावर डाव्या विचारधारेचा प्रभाव पडला. त्यामुळे त्यांनी घरातून पळून जाऊन नक्षलवादी आंदोलनात भाग घेण्याचा निर्णय घेतला. या काळात त्यांची अनेक नक्षलवादी नेत्यांशी जवळीक झाली.  मिथुन यांचे चारु मुजुमदार यांच्याशी जवळचे संबंध होते. चारु मुजुमदार हे नक्षलवाद्यांचे आक्रमक नेते मानले जायचे.

या काळात पोलिस नक्षलवाद्यांच्या हात धुवून मागे लागले होते. त्यामुळे मिथुन काही दिवस अंडर ग्राऊंड झाले. त्यांचा भाऊपण नक्षलवादी आंदोलनाशी जोडला गेला होता. पोलिसांनी त्यांच्या भावाला पकडलं. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या त्रासात त्यांच्या भावाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. भावाच्या मृत्यूमुळे मिथुन यांना हादरवून सोडलं. नक्षलवादी नेत्यांचा पोकळपणा यावेळी त्यांना दिसून आला. त्यानंतर आंदोलनाचा मार्ग सोडत त्यांनी मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला. 

मिथुन यांना पहिल्यापासून अॅक्टिंगची आवड होती. त्यांनी बंगालमध्ये थिएटर करण्यास सुरुवात केली. नक्षलवाद सोडून अॅक्टिंगकडे वळलेल्या मिथुन यांना सुरुवातीच्या काळात खूप अडचणी आल्या. नक्षलवाद सोडून पुन्हा लोकांमध्ये आलेल्यांना पोलिस एनकाऊंटरमध्ये मारायचे. मिथुन यांच्यासोबत असंच काही होण्याची शक्यता होती. पण, मित्रांनी याकाळात त्यांची फार मदत केली. ते अनेक दिवस लपून बसले होते. मिथुन यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. पण, ते येण्याआधीच त्यांची किर्ती तेथे पोहोचली होती. लोक त्यांच्यावर नक्षली असल्याचा ठपका ठेवायचे आणि त्यांच्याकडे शंकेच्या नजरेने पाहायचे.

मिथुन यांनी पुण्याच्या एफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला. यावेळी त्यांची अनेक कलाकारांशी भेट झाली. शक्ती कपूर हे त्यातील एक. मिथुन यांनी शक्ती कपुरची रँगिग केल्याचा किस्सा मोठ्या चवीने सांगितला जातो. पुढे या दोघांची घट्ट मैत्री झाली. मिथुन यांचे बॅकग्राऊंड पाहता त्यांना चित्रपट देण्यास कोणीही तयार नव्हते. अखेर बंगालच्याच मृणाल सेन यांनी मृगया या चित्रपटातून त्यांना पहिला ब्रेक दिला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. मिथुन यांना या चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर मिथुन यांना अनेक चित्रपट मिळत गेले. 

मिथुन यांची राजकारणात एन्ट्री

मिथुन यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकारणात येण्याची ऑफर दिली. २०१४ साली मिथुन तृणमूलच्या तिकीटावर राज्यसभेत गेले. पण, २०१६ मधील शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मिथुन अडीच वर्षात केवळ तीनवेळा संसदेत गेले होते. मिथुन यांनी राजकीय सन्यास घेतला होता. पण, ते आता पुन्हा भाजपसोबत आपली राजकीय कारकीर्द सुरु करताहेत. कधीकाळी भाजप आणि संघाच्या नेत्यांनी मिथुन यांना अरबन नक्षल ठरवलं होतं. त्याच भाजपसोबत मिथुन यांनी हातमिळवणी केलीये. मिथुन यांचा पश्चिम बंगालमध्ये आजही एक मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे विधानसभा निकालावर याचा काय परिणाम पडतो हे पाहावं लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com