esakal | ममतांचीच ‘दीदी’गिरी
sakal

बोलून बातमी शोधा

Mamta Banerjee

बंगालमध्ये ममतांचीच ‘दीदी’गिरी

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली/ कोलकता - अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने जबरदस्त झुंज देत विजयश्री खेचून आणली. शेवटच्या टप्प्यामध्ये ममतांना नंदीग्रामचा गड अवघ्या काही मतांनी गमवावा लागला खरा पण, दीदींनी येथील पराभव देखील मान्य केलेला नाही. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याचा निर्धार ममतांनी बोलून दाखविला आहे. तमिळनाडूमध्ये सत्तांतर झाले असले तरी केरळ, आसाममधील जनतेने मात्र तेथील सत्ताधीशांच्या बाजूनेच कौल दिला आहे. पुदुच्चेरीमध्येही भाजपचीच सरशी झाली आहे.

प्रचारादरम्यान अपघात झाल्याने व्हीलचेअरवरून प्रचार करणाऱ्या ममता आज निकालानंतर जनतेला चालताना दिसल्या. जनतेने स्पष्ट कौल दिल्याने त्या उद्या (ता. ३) संध्याकाळी राज्यपालांची भेट घेणार आहेत.

Winner Seats

Winner Seats

भाजपची ताकद वाढली

वंगभूमीत भाजपचा शक्तिशाली विरोधी पक्ष म्हणून उदय झाला आहे. काँग्रेस, डावे पक्ष आणि आयएसएफ यांची आघाडी असलेल्या संयुक्त मोर्चाच्या पदरी मात्र निराशाच आली असून या आघाडीचा म्हणावा तसा प्रभाव दिसू शकलेला नाही. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना येथे जबरदस्त फटका बसला आहे. एकगठ्ठा मुस्लिम मते तृणमूलच्या पारड्यात पडल्याने सगळे चित्रच बदलले.

हेही वाचा: निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपनं ५० चा आकडाही गाठला नसता - ममता बॅनर्जी

स्टॅलिन बनले सर्वेसर्वा

तमिळनाडूमध्ये करूणापूत्र स्टॅलिन यांचा सूर्योदय झाला असून या पक्षासोबत आघाडी केल्याचा मोठा फायदा काँग्रेसला झाला आहे. अण्णाद्रमुकला मात्र सत्ता गमवावी लागली असून भाजपच्या हातीही फारसे घसघशीत यश लागलेले नाही. कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यमलाही फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. पक्षाचे संस्थापक खुद्द कमल हसन हे देखील पिछाडीवर पडल्याचे पाहायला मिळाले. एस. रामदोस यांचा पीएमके आणि व्हीसीके या पक्षांनाही बऱ्यापैकी मते मिळाली आहेत. अण्णाद्रमुकचे दोन बडे नेते मुख्यमंत्री के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम हे अनुक्रमे इडापड्डी आणि बोदीनायाकनूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत

देवभूमीत डाव्या आघाडीची सरशी

केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीला सत्ता राखण्यात यश आले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीला मात्र पुढील पाच वर्षे विरोधी पक्षांची जबाबदारी पार पाडावी लागेल. मागील निवडणुकीत खाते उघडणाऱ्या भाजपला यावेळेस फारशी चमकदार कामगिरी दाखविता आली नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा के. राजशेखरन, के. सुरेंद्रन, शोभा सुरेंद्रन आणि ई.श्रीधरन ही मंडळी आघाडीवर होती.

पुदुच्चेरी, आसाममध्ये भाजप

पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात देखील भाजपचा झेंडा फडकला आहे. भाजपचा समावेश असलेल्या एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखालील एआयएनआरसीने मुसंडी मारत सिंहासन काबीज केले आहे. काँग्रेसला मात्र येथेही पराभव सहन करावा लागला. आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मोठे यश मिळवले आहे आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडी मात्र सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. भाजपचे मित्र पक्ष असलेल्या आसाम गण परिषद आणि युनायटेड पीपल्स पार्टीलाही घसघशीत मते मिळाली आहेत.

हेही वाचा: VIDEO: तमिळनाडूत का झाला सत्तापालट? जाणून घ्या कारण

भाजप कार्यालयाची जाळपोळ

कोलकता - राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर येथील अमरबाग परिसरातील भाजपच्या कार्यालयामध्ये जाळपोळ करण्यात आली. हे भाजपचे कृत्य असल्याचा आरोप तृणमूलकडून करण्यात आला आहे. विष्णपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याचा आरोप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे.

सुवेंदू अधिकारी ठरले जाएंट किलर

राज्यात दणदणीत विजय मिळविला असताना ममता यांना नंदीग्राममध्ये अटीतटीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. येथील तृणमूलचे प्रबळ नेते आणि सुवेंदू अधिकारी यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा रस्ता धरल्यानंतरही ममता यांनी धाडसाने नंदीग्राममधूनच निवडणूक लढवली होती. मतमोजणीतच्या फेऱ्यांमध्ये सातत्याने आघाडी आणि पिछाडीवर जाणाऱ्या ममतांचा अधिकारी यांनी १९५७ मतांनी पराभव केला. भाजप आता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे आल्याने अधिकारी यांचे महत्त्व वाढणार आहे. पक्षाचा विजय झाल्यानंतर अनेक ठिकाणी तृणमूलचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना, ममता यांनी मात्र लोकांना कोरोना नियम पाळत घरी जाण्याचे आवाहन केले. नंदीग्राममधील पराभव स्वीकारला असल्याचेही ममता म्हणाल्या. मात्र, त्या निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे काही सूत्रांचे म्हणणे आहे.

माझ्यावर प्रेम आणि विश्‍वास दाखविल्याबद्दल नंदीग्रामच्या जनतेचे आभार. मी कायम जनतेसाठी काम करत राहील.

- सुवेंदू अधिकारी, नेते भाजप

जल्लोष न रोखणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

कोरोनाचा प्रसार वाढत असताना विधानसभा निवडणुकीचा विजयोत्सव रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, असा आदेश निवडणूक आयोगाने पाच राज्यांना दिला आहे. या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर एकत्र येऊन जल्लोष करायचा नाही, असा बंदी आदेश यापूर्वीच आयोगाने दिला होता. परंतु पश्‍चिम बंगाल आणि तमिळनाडू येथे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमून विजयी जल्लोष केल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे प्रकार रोखण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत. तसेच त्यांच्या विरोधात फौजदारी आणि शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचा आदेशही दिला आहे.

loading image
go to top