हल्ल्यानंतरच्या काळात मोदी काय करीत होते : काँग्रेस

पीटीआय
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपर्कात नव्हते, ही बाब अतिशय गंभीर आहे. 

- अहमद पटेल, ज्येष्ठ नेते, कॉंग्रेस 
 

नवी दिल्ली : पुलवामात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दुपारी 3.10 ते सायंकाळी 5.10 या दोन तासांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करीत होते, याचे उत्तर त्यांनी द्यायलाच हवे. त्यांना या घटनेची अजिबात कल्पना नव्हती, की ते असंवेदनशील आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे प्रतिपादन कॉंग्रेसने शुक्रवारी केले.

पुलवामातील हल्ल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चित्रीकरण करीत असल्याचा दावा करीत कॉंग्रेसने मोदी व भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपने हा दावा फेटाळून लावला असला, तरी कॉंग्रेसने आजही मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान त्या दिवशी सायंकाळी 5 वाजून दहा मिनिटे झाली असताना उत्तराखंडमधील सभेत दूरध्वनीच्या माध्यमातून भाषण देत होते, असा दावा कॉंग्रेसने "डीडी न्यूज'वरील चित्रीकरणाचा हवाला देत केला.

कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, की पुलवामात हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान पत्रकार परिषदेत बोलत होते, तसेच जिम कॉर्बेट अभयारण्यात चित्रीकरणात गुंग होते. दुपारी 3.10 ते सायंकाळी 5.10 या वेळेत ते काय करीत होते, याचे उत्तर मोदी यांनी द्यायला हवे. या वेळेत ते उत्तराखंडमधील सभेत बोलत होते आणि पुलवामा हल्ल्याचा त्यांनी एका शब्दानेही उल्लेख केला नाही, अशी टीका त्यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Modi was doing during the attack says Congress