Atal Bihari Vajpayee : हा युवक एक दिवस भारताचा पंतप्रधान होईल..! 

गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

'हा युवक पाहा.. एक दिवस हा भारताचा पंतप्रधान होईल..' असे भाकीत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वर्तविले होते.. ते भाकीत त्यानंतर काही दशकांनी खरे ठरले.. आयुष्यभर कॉंग्रेसविरोधी राजकारण केलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयीच पंडित नेहरू यांनी ते वाक्‍य उच्चारले होते. परराष्ट्र संबंधांविषयीची वाजपेयी यांची जाण, स्वच्छ हिंदी आणि मंत्रमुग्ध करणारी भाषणशैली ही त्यांची वैशिष्ट्‌ये कारकिर्दीच्या सुरवातीपासूनच दिसत होती. वाजपेयी यांच्या याच गुणांमुळे पंडित नेहरू प्रभावित झाले होते. 

वाजपेयी यांनी 1955 मध्ये लखनौमधून निवडणूक लढविली होती. पंडित नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांच्या राजीनाम्यामुळे त्या जागेवर निवडणूक झाली होती. या निवडणुकीत वाजपेयी यांचा पराभव झाला; पण त्यांच्या भाषणशैलीचे सर्वदूर कौतुक झाले. दोन वर्षांनंतर, म्हणजे 1957 मध्ये वाजपेयी यांनी तीन मतदारसंघांतून अर्ज दाखल केले होते. त्यापैकी मथुरामध्ये त्यांची अनामत रक्कम जप्त झाली, लखनौमध्ये चांगली मते मिळूनही थोडक्‍यात पराभव झाला आणि बलरामपूरमधून ते जिंकले. 

1977 मध्ये मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये वाजपेयी यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी होती. पदभार स्वीकारण्यासाठी वाजपेयी त्यांच्या कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी वाजपेयी त्यांच्या सचिवांना म्हणाले, 'माझ्या आठवणींनुसार, या कार्यालयात पंडित नेहरू यांचे छायाचित्र होते. ते आता कुठे गेले? ते छायाचित्र पुन्हा लावा!' कॉंग्रेसविरोधी पक्षांची सत्ता आल्याने त्यांना पंडित नेहरू यांचे छायाचित्र आवडणार नाही, असा विचार करून संबंधित अधिकारवर्गाने ते छायाचित्र हटविले होते. 

वाजपेयी यांनी संसदेमध्ये प्रभावी वक्तृत्वशैलीच्या जोरावर मुद्देसूद भाषणे करून सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्यांवर घेरले होते. मात्र, 1964 मध्ये पंडित नेहरू यांचे निधन झाल्यानंतर वाजपेयी यांनी संसदेमध्ये दिलेले भाषण ऐतिहासिकच ठरले. देशाच्या सर्वोच्च पातळीवर पक्षातीत राजकारण कसे असावे, याचा वस्तूपाठच वाजपेयी यांनी घालून दिला होता. 'एखादं स्वप्न अधुरंच राहिलं.. एखादं गीत अपूर्ण राहिलं, असं पंडित नेहरूंच्या मृत्यूमुळे वाटत आहे. यामुळे केवळ नेहरू कुटुंबीयांचीच हानी झालेली नाही, तर देशासाठी दु:खाची गोष्ट आहे..', असे वाजपेयी त्यावेळी म्हणाले होते. 

Web Title: What Pandit Nehru said about Atal Bihari Vajpayee