चिनी अ‍ॅपवरील बंदीचा काय होणार परिणाम? जाणून घ्या...

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जून 2020

भारत सरकारने मंगळवारी 59 चिनी अॅपवर बंदी आणल्याचं जाहीर केलं आहे. भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात  चिनी अॅप वापरत आले आहेत. त्यामुळे भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फटका भारतीयांनाही बसणार आहे

नवी दिल्ली- भारत सरकारने मंगळवारी 59 चिनी अॅपवर बंदी आणल्याचं जाहीर केलं आहे. भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात  चिनी अॅप वापरत आले आहेत. त्यामुळे भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फटका भारतीयांनाही बसणार आहे. छोटे व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रसिद्ध अॅप टिकटॉक, शेअर इट, कॅम स्कॅनर, यूसी ब्राऊझर इत्यादी अॅप आता लोकांना वापरता येणार नाहीत.  

माहिती तंत्रज्ञान कायदा,  2000 कलम 69A नुसार चिनी अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. भारत सरकारने या कंपन्यांवर माहिती चोरीचा आरोप केला आहे. देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता याला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराची गय केली जाणार नाही, असं म्हणत सरकारने हे पाऊल उचललं आहे. चिनी अॅप विरोधात बऱ्याच तक्रारी आमच्याकडे येत होत्या. माहिती चोरणे आणि ती देशाबाहेर इतर ठिकाणी पाठवणे असे प्रकार या अॅपकडून होत होते. याचा भारताच्या सुरक्षिततेवर सखोल परिणाम होत होता. त्यामुळे आम्ही तात्काळ पाऊल उचलून अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचं माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटलं आहे. 

चीनमध्ये तयार झाला नवा व्हायरस, जगासाठी किती धोकादायक?
सरकारच्या सूचनेनुसार इंटरनेट पुरवढादारांना 59 चिनी अॅपना ब्लॉक करावं लागणार आहे. मात्र, ज्या अॅपना इंटरनेटची आवश्यकता नाही आणि जे आधीपासूनच इन्स्टॉल आहेत अशा अॅपचा वापर करता येणार आहे. मात्र, नवीन चिनी अॅप आता प्ले स्टोरवरुन डाउनलोड करता येणार नाहीत.

चिनी अ‍ॅपवरील बंदीचा काय परिणाम होणार?

भारत सरकारने बंदी घातलेल्या अॅपपैकी टिकटॉक हे सर्वाधिक लोकप्रिय अॅप आहे. टिकटॉकचे भारतात एकूण 10 करोड सक्रिय वापरकर्ते आहेत. हेलो, लाईकी आणि व्हिडिओ चाटिंग अॅप बिगो हे अॅपही भारतीय मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यामुळे या अॅपच्या वापरकर्त्यांना आता नव्या पर्यायांचा शोध घ्यावा लागणार आहे.

लोकसंख्या घटविण्यासाठी बळजबरीने नसबंदी, अटकसत्र

चिनी अॅपच्या कंपन्यांची भारतात कार्यालये आणि मोठा कर्मचारी वर्ग आहे. त्यामुळे हजारो भारतीय लोकांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. तसेच या अॅपच्या माध्यमातून अनेक जण पैसा कमावत होते. अॅपवरील बंदीमुळे त्यांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. 

भारतीय सरकारचा अॅपवरील बंदीचा निर्णय दूरगामी आहे. हा निर्णय ठराविक रणनीती आणि राष्ट्रीय सुरक्षेला समोर ठेवून घेण्यात आला आहे. अॅपवरील बंदीच्या निर्णयातून सरकारने भारतातील बड्या चिनी कंपन्यांना आणि चीनला थेट इशारा दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What will be the effect of the ban on Chinese apps