नियमित रेल्वे कधी सुरु होणार? IRCTC ने दिलं उत्तर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 September 2020

 कोरोनामुळे भारतात मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यानंतर जुन महिन्यापर्यंत सर्व सेवा ठप्प होत्या. आता हळू हळू लॉकडाउनचे नियम शिथिल केले जात आहेत.

नवी दिल्ली - कोरोनामुळे भारतात मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यानंतर जुन महिन्यापर्यंत सर्व सेवा ठप्प होत्या. आता हळू हळू लॉकडाउनचे नियम शिथिल केले जात आहेत. दरम्यान, राज्यांतर्गत वाहतुकीसाठी असणारे निर्बंधही कमी करण्यात आले आहेत. रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी आता मोठी बातमी आहे. लॉकडाउनमुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे बंद आहे. ती कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून रेल्वेनंच याबाबतची माहिती दिली आहे. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रोला हिरवा कंदील दाखवल्यानंतर रेल्वेही सुरु होणार का असा प्रश्न विचारला जात होता. मात्र सप्टेंबर महिन्यात सर्वांसाठी रेल्वे सुरु होणार नसल्याची माहिती समजते. 

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक महेंद्र प्रताप मल यांनी सीएनबीसी आवाजशी बोलताना रेल्वेबाबत माहिती दिली. सप्टेंबरमध्ये रेल्वे सुरु कऱण्याबाबत कोणतीही योजना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सध्या तरी नियमित रेल्वे सुरु होणार नाही. प्रवाशांकडून मागणी वाढली तर रेल्वे सुरु केली जाऊ शकते असंही ते म्हणाले. 

हे वाचा - असंघटित क्षेत्र संपवण्याचा मोदी सरकारचा डाव; राहुल गांधींचा गंभीर आरोप

देशात अनलॉक 4 ची प्रक्रिया सुरु झाली आहे. आता रेल्वेकडून 230 एक्सप्रेस ट्रेन चालवण्यात येत आहेत. यामध्ये 30 राजधानी एक्सप्रेसचा समावेश आहे. आता जवळपास 100 नव्या स्पेशल ट्रेन सुरु करण्याची तयारी रेल्वे करत आहे. यासाठी रेल्वेची राज्य सरकारांसोबत चर्चा चालू आहे. गृह मंत्रालयाकडून याला मंजुरी मिळताच नव्या स्पेशल ट्रेन धावतील. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 22 मार्चपासून प्रवाशी रेल्वे आणि एक्स्प्रेस रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. देशाच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे सेवा पूर्ण बंद करण्यात आली आहे. दरम्यान, देशातील अनेक भागात अडकलेल्या लोकांना घरी पोहोचवण्यासाठी 1 मेपासून श्रमिक स्पेशल रेल्वे सुरु केल्या होत्या. 12 मेपासून राजधानीच्या काही स्पेशल ट्रेन सुरु करण्यात आल्या होत्या. 1 जूनपासून 100 रेल्वे सुरु करण्यात आल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when railway will resume for passangers irctc give information