राजदीप सरदेसाईंवर फेक न्यूज पसरवल्याचा ठपका; इंडिया टुडेमधून राजीनामा?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

चॅनेलने त्यांच्यावर फेक न्यूज पसरवल्याचा ठपका ठेवत दोन आठवड्यांसाठी ऑफ-एअर म्हणजेच चॅनेलवर न दिसण्याचा निर्णय घेतला होता.

नवी दिल्ली : इंडिया टुडे  चॅनेलचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांनी चॅनेलचा राजीनामा दिल्याची माहिती 'Opindia' ने दिली आहे. चॅनेलने त्यांच्यावर फेक न्यूज पसरवल्याचा ठपका ठेवत दोन आठवड्यांसाठी ऑफ-एअर म्हणजेच चॅनेलवर न दिसण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यांचे एक महिन्याचे वेतन देखील कापले गेले होते. राजदीप सरदेसाई यांनी प्रजासत्ताक दिनाला शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भात खोटी बातमी पसरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

राजदीप सरदेसाई यांनी चॅनेलच्या सोशल मीडिया पॉलिसीचे वारंवार उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कटू कारवाई केली गेल्याचे चॅनेलने म्हटलं होतं. हा त्यांचा अपमान समजत त्यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला इंडिया टुडे किंवा राजदीप सरदेसाई यांच्याकडून पुरेसा दुजोरा मिळाला नाहीये.

हेही वाचा - माध्यमांच्या भडकाऊ कार्यक्रमाबाबत चिंता; सुप्रीम कोर्टाने खेचले केंद्र सरकारचे कान
प्रजासत्ताक दिनाला राजदीप सरदेसाई यांनी नवनीत नावाच्या एका आंदोलकाचा फोटो टाकला होता. आणि म्हटलं होतं की दिल्ली पोलिसांच्या गोळीबारामध्ये यांचा मृत्यू झाला आहे. पुढे त्यांनी म्हटलं होतं की शेतकऱ्यांचं हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. तसेच त्यांनी तिरंग्याने अच्छादलेला मृताचा फोटो देखील ट्विट केला होता. मात्र, या आंदोलकाचा मृत्यू बॅरिकेड तोडताना झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती दिली गेली आहे. याबाबत त्यांना विचारणा केली गेल्यावर ट्विटरवरुन त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. नंतर त्यांनी इंडिया टुडे चॅनेलवर लाईव्ह जाऊन पुन्हा खोटं बोलून पोलिसांच्या गोळीबारात त्या आंदोलकाचा मृत्यू झाल्याचेच सांगितले. म्हणून चॅनेलने त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whether Rajdeep Desai sacked by India Today for spreading fake news