कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल भगतसिंह कोशियारी?

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 1 September 2019

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोशियारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त करण्याच्या हालचाली गतिमान असल्याची माहिती 'सकाळ'ला मिळाली. 

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोशियारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त करण्याच्या हालचाली गतिमान असल्याची माहिती 'सकाळ'ला मिळाली. 

विद्यमान राज्यपाल विद्यासागर राव यांची मुदत लवकरच संपत आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भाजप श्रेष्ठींचा मनात विविध नावांचा विचार सुरू होता. २०१९ च्या लोकसभेचे तिकीट नाकारलेल्या माजी सभापती सुमित्राताई महाजन यांचेही नाव मध्यंतरी चर्चेत आले होते. मात्र या सर्व नावांच्या यादीतून त्यांचे नाव राज्याच्या राज्यपाल पदासाठी गंभीरपणे विचारात घेतल्याचे 'सकाळ'ला आज रात्री उशिरा समजले.

कोण आहेत कोशियारी?

कोशियारी हे भाजपचे जनसंघापासूनचे ज्येष्ठ नेते आहेत. अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात उत्तराखंड या नवीन राज्याची निर्मिती झाली आणि नंतर तेथील सत्ता मिळवली त्यानंतर ते राज्याचे पहिले भाजप मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी विविध पदे भूषविली.

2014 मध्ये ते लोकसभेत निवडून आले. मात्र 2019 मध्ये निवडणूक लढवण्यास पक्षाच्या 75 वर्ष वयाच्या अटीनुसार त्यांनी स्वतः नकार दिला. यांचा उत्तराखंडमधील जनसंपर्क दांडगा आहे. राज्यात आलेल्या महाप्रलयाच्या आपत्तीत त्यांनी मुख्यमंत्री नसतानाही जे काम केले. त्यामुळे ते संघ परिवाराच्या विशेष मर्जीत आले. वयाची ऐंशी वर्षे पार केलेले कोशियारी यांचा शारीरिक फिटनेस तरुणांना लाजवेल असा आहे. त्यांचे नाव राज्यपालपदी आघाडीवर असल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is Bhagat Singh Koshyari the new governor of Maharashtra