कंगना बोलली महिला अत्याचारावर; सौदी अरेबियातील कायद्याचं केलं कौतुक

टीम ई सकाळ
Saturday, 9 January 2021

काही पीडित महिला तर न्यायालयीन प्रकियेत वेळ जातो म्हणून तक्रारही करत नाहीत. यासाठी कायद्यात बदल करण्याची गरज आहे असंही तिने म्हटलं.

भोपाळ - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी भोपाळमध्ये आहे. चित्रपटाच्या शूटिंगआधी तिने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिला सामूहिक बलात्कार, महिलांवरील अत्याचाराबाबत विचारले असता कंगनाने सांगितलं की, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना चौकात फासावर लटकवलं पाहिजे. तसंच भारतातही कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचं तिने म्हटलं.

सामूहिक बलात्कार आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना होणाऱ्या शिक्षेबाबत बोलताना कंगना म्हणाली की, जगातील काही देशांमध्ये अशा आरोपींना चौकात फासावर लटकवतात. मात्र आपल्या देशात गुन्हेगारांना शिक्षा देण्यास वेळ लागतो. काही पीडित महिला तर न्यायालयीन प्रकियेत वेळ जातो म्हणून तक्रारही करत नाहीत. यासाठी कायद्यात बदल करण्याची गरज आहे असंही तिने म्हटलं.

सौदी अरेबियासारख्या देशांप्रमाणे आपल्या देशातही सामूहिक बलात्कार प्रकऱणातील आरोपींना चौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी. जोपर्यंत देशात अशी शिक्षा 4-5 वेळा दिली जाणार नाही तोपर्यंत असे प्रकार होतच राहतील. आंतरजातीय लग्नांमध्ये फसवणूक होणाऱ्यांसाठी लव्ह जिहाद हा कायदा योग्य आहे असंही कंगना म्हणाली. 

हे वाचा - कंगनाला फुकाची 'टीवटीव' भोवली; '100 रुपयांसाठी आंदोलन करणारी आजी'च्या ट्विटमुळे मानहानीचा खटला

कंगनाने शनिवारी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. कंगनासोबत यावेळी तिच्या नव्या चित्रपटातील इतर कलाकारही होते. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर कंगनाने मध्यप्रदेश पर्यटन मंडळ, पंचमढी आणि इतर पर्यटन स्थळांबाबत कौतुकाचे उद्गार काढले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who commit crimes against women hanged on road like Saudi Arabia says kangana