
आधीपासूनच कायदेशीर अडचणींच्या कचाट्यात अडकलेल्या कंगनाविरोधात आता बठिंडा (पंजाब) येथे मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रणौत हिला ट्विटरवर वाचाळ वक्तव्य करणे चांगलेच भोवत आहे. तिचे असेच एक ट्विट आता तिच्या अडचणीत वाढ करणार आहे. आधीपासूनच कायदेशीर अडचणींच्या कचाट्यात अडकलेल्या कंगनाविरोधात आता बठिंडा (पंजाब) येथे मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 73 वर्षीय मोहिंदर कौर यांनी ही तक्रार दाखल आहे. कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाविरोधात मत मांडताना अनेक ट्विट्स केले होते. त्यावेळी कंगनाने मोहिंदर कौर यांची तुलना दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सहभागी होणा-या 90 वर्षीय बिलकीस दादीसोबत केली होती.
त्या ट्विटमध्ये कंगनाने दावा केला होता की, त्या 100 रुपयांसाठी प्रत्येक आंदोलनात सहभागी होत असतात. शुक्रवारी मोहिंदर कौर यांचे वकील रघबीर सिंग यांनी सांगितल्यानुसार, कंगनाविरोधात आयपीसीच्या कलम 499 (मानहानी) आणि 500 (मानहानीची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 जानेवारी रोजी कोर्टात यावर सुनावणी होणार आहे. पंजाबच्या 73 वर्षीय कौर यांनी तक्रारीत म्हटलंय की, कंगना रणौतने ट्विटरवर त्यांचा उल्लेख शाहिन बागमधील दादीशी तुलना करुन चुकीचा आणि दिशाभूल करणारा दावा केला आहे.
पुढे त्यांनी म्हटलंय की, या प्रकारच्या टीपण्णीमुळे माझी प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान खालावला गेला आहे. माझी प्रतिमा मलीन झाली आहे. चुकीच्या आणि निंदनीय ट्वीटमुळे, मला तसेच माझे कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी आणि सहकारी लोकांना गंभीर मानसिक ताणतणावाला सामोरे जाऊन मानहानीचा त्रास सहन करावा लागला आहे.
हेही वाचा - ट्रम्प यांच्या ट्विटरला मुसक्या; 'हिंसक टिवटिव'ची शक्यता वर्तवून अकाऊंट कायमचं बंद
कौर यांनी पुढे म्हटलंय की, रणौत यांनी याबाबत साधी माफी देखील मागितली नाहीये. कंगनाने कौर यांचा उल्लेख बिल्कीस बानो असा केला होता. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीच्या शाहिनबागमधील आंदोलनाच्या आयकॉन बनलेल्या बिल्कीस बानो या मध्यंतरी चर्चेत आल्या होत्या. टाइम मॅगझीनने जगातील प्रभावशाली 100 महिलांमध्ये त्यांचा समावेश केला होता. कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाबाबत भाष्य करताना ट्विटरवर म्हटलं होतं की, शाहिन बागच्या दादीने देखील शेतकऱ्यांच्या या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. कौर यांचा फोटो ट्विट करत तिने म्हटलं होतं की ही तिच दादी आहे जी 100 रुपयांसाठी कोणत्याही आंदोलनात उपलब्ध राहते. त्यानंतर या दोन्हीही महिला वेगळ्या आहेत हे समजल्यानंतर कंगनाने ते ट्विट डिलीट केलं होतं.