who is Bibhav Kumar
राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार यांना उद्या राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. बिभव कुमार यांच्यावर दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. (Swati Maliwal Assault Case)
बिभव कुमार हे केजरीवालांच्या जवळचे मानले जातात. ते विश्वासू सहकारी आहेत. एकेकाळी बिभव कुमार हे व्हिडिओ एडीटर होते. मनीष सिसोदीया यांच्यासोबत ते काम करत होते. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात अटक झालेले केजरीवाल तिहार तुरुंगात असताना त्यांनी तुरुंग प्रशासनाला ज्यांना भेटायचे होते त्यांची यादी दिली होती. या यादीत बिभव कुमारचेही नाव होते.
काय आहे प्रकरण?
आपचे राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांनी सांगितले की, गेल्या सोमवारी स्वाती मालीवाल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी पोहोचल्या आणि त्या ड्रॉईंग रूममध्ये बसल्या होत्या. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार तेथे आले आणि त्यांनी स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, त्यानंतर स्वाती मालीवाल यांनी 112 वर कॉल करून या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांना दिली. पत्रकार परिषद घेताना संजय सिंह म्हणाले की, सीएम अरविंद केजरीवाल यांनी या घटनेची दखल घेतली असून कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
कोण आहेत बिभव कुमार?
बिभव कुमार आणि अरविंद केजरीवाल यांची मैत्री अनेक वर्षे जुनी आहे. बिभव कुमार आणि अरविंद केजरीवाल अनेक वर्षांपासून एकत्र काम करत असल्याचे द प्रिंटमधील एका वृत्तात म्हटले आहे. कालांतराने त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली. केजरीवाल यांची रोजची दिनचर्याही विभव कुमारच ठरवतात, असं म्हटलं जातं. बिभव कुमार हे केजरीवाल यांचे राईट हॅन्ड मानले जातात.
बिभव कुमार अनेकदा चर्चेत असतात. गेल्या महिन्यातच दक्षता विभागाने त्यांची नियुक्ती रद्द केली होती. त्यांची 2015 मध्ये अरविंद केजरीवाल यांचे वैयक्तिक सचिव (पीए) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2020 मध्ये आम आदमी पक्षाने पुन्हा सरकार स्थापन केल्यानंतर त्यांची पुन्हा या पदावर नियुक्ती करण्यात आली.
बिभव कुमारवर फौजदारी खटला सुरू आहे. नोएडा डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये काम करणाऱ्या महेश पाल यांनी 2007 मध्ये बिभव कुमार यांच्याविरोधात शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दक्षता विभागाने गेल्या महिन्यात त्यांना बडतर्फ करताना सांगितले होते की, त्यांच्या नियुक्तीपूर्वी त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्याची चौकशी करण्यात आली नाही.
यापूर्वी 8 एप्रिल रोजी कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीनेही त्यांची चौकशी केली होती. मनी लाँडरिंग कायद्यान्वयेही त्यांचे जबाब नोंदविण्यात आले. बिभव कुमार हे त्यांच्या सरकारी बंगल्याबाबतही चर्चेत असतात. गेल्या वर्षी दक्षता विभागाने पीडब्ल्यूडीला कुमार यांच्या टाइप-6 बंगल्याचे वाटप रद्द करण्याचे आदेश दिले होते. नियमांचे उल्लंघन करून हा बंगला त्यांना देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. हा बंगला दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स भागात आहे. हा बंगला मार्च 2021 मध्ये विभव कुमार यांना देण्यात आला होता.
सहा महिन्यांपूर्वी पीडब्ल्यूडीने बंगल्याचे वाटप रद्द करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, त्यांनी बंगला रिकामा केला नाही. गेल्या महिन्यात दक्षता विभागाने त्यांना बडतर्फ केल्यावर पीडब्ल्यूडीने त्यांना महिनाभरात बंगला रिकामा करण्यास सांगितले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.