महाराष्ट्र ते केरळ एक वर्ष लागलं मग जहाजाने का नाही नेलं? वाचा कारण

सूरज यादव
मंगळवार, 21 जुलै 2020

महाराष्ट्रातून केरळला जात असताना या ट्रकसोबत नेहमी 32 जण असायचे. यात इंजिनिअर्स, मेकॅनिक यांचा समावेश होता. ट्रकमध्ये 70 टनांहून अधिक वजन असलेलं एअरोस्पेस ऑटोक्लेव पोहोचवण्यासाठी एक वर्ष इतका काळ लागला. 

तिरुवनंतपुरम - सध्या सोशल मीडियावर एका ट्रकला महाराष्ट्र ते केरळ असा 1700 किमी प्रवास करायला एक वर्ष लागल्याची चर्चा होत आहे. महाराष्ट्रातील नाशिकमधून केऱळच्या तिरुवनंतपुरम इथं एअरोस्पेस ऑटोक्लेव या ट्रकमधून नेण्यात आलं होतं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात नाशिकमधून ट्रकचा प्रवास सुरु झाला होता. तो 19 जुलै 2020 ला केरळमध्ये पोहोचला. याचे फोटो एएनआयने शेअर केले होते. 38 चाके असलेल्या या ट्रकमध्ये 70 टनांहून अधिक वजन असलेलं एअरोस्पेस ऑटोक्लेव पोहोचवण्यासाठी एक वर्ष इतका काळ लागला. या ऑटोक्लेवचा वापर एअरोस्पेस प्रोडक्टच्या निर्मितीसाठी केला जातो. 

याबाबत ट्रकच्या कर्मचाऱ्याने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, 8 जुलै 2019 रोजी महाराष्ट्रातील नाशिक इथून प्रवास सुरु झाला होता. चार राज्यांतून प्रवास करत तिरुवनंतपुरममध्ये पोहोचायला एक वर्ष लागलं. 1700 किमीचा प्रवास पूर्ण करताना दररोज फक्त 5 किमी अंतर कापले जायचे. यावेळी रस्त्यावरून इतर वाहतूक पूर्ण बंद केली जात असे. 

महाराष्ट्रातून केरळला जात असताना या ट्रकसोबत नेहमी 32 जण असायचे. यात इंजिनिअर्स, मेकॅनिक यांचा समावेश होता. ट्रकच्या मार्गात येणाऱे अडथळे दूर करण्यासाठी काही लोक सोबत होते. तसंच सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची गाडीही होती. ट्रकमध्ये 7.5 मीटर उंच ऑटोक्लेव असल्यानं अनेक ठिकाणी रस्त्यात झाडांच्या फांद्या आणि वीजेच्या तारा यायच्या. त्या बाजुला करण्यासाठी एक पथक ट्रकसोबत असायचं. इतका अडथळा पार करत रविवारी ऑटोक्लेव सुरक्षितपणे केरळमध्ये पोहोचलं. 

आणखी वाचा - गुन्हेगाराच्या शोधासाठी श्वान धावले 12 किमी अन्...

दरम्यान, मशिन मालवाहू जहाजाने का नेलं नाही? जहाजातून ते आणखी कमी वेळेत पोहोचलं असंत असं म्हटलं जातं आहे. पण ऑटोक्लेवचा आकार मोठा असल्यानं त्याची वाहतूक करणं हे एक आव्हानच होतं. ज्या ट्रकमध्ये हे ऑटोक्लेव लादून नेलं त्याची वाहतूक करत असताना वाटेत येणाऱे घाट किंवा इतर अडचणी या बाबीही महत्वाच्या होत्या. तसंच ऑटोक्लेवची उंची जास्त असल्यानं जहाजातून ते नेण्यात आलं नाही अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे. जहाजाने न्यायचं झालं तर ते मुंबईपर्यंत रस्त्यानेच न्यावं लागलं असतं. त्यासाठी घाटरस्त्याचा मोठा अडथळा होता. भलामोठा ट्रक घाटातून घेऊन जाणं अशक्य होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why autoclave delivery by road from maharashtra to kerala