भारतात पुन्हा वेगानं का वाढतोय कोरोनाचा संसर्ग? जाणून घ्या यामागील पाच प्रमुख कारणं

टीम ई-सकाळ
Saturday, 27 February 2021

संसर्गाचं प्रमाणं वाढण्यामागे कमी तपासण्या, नवे स्ट्रेन आणि लसीकरणाला उशीर यांसह अशी काही प्रमुख पाच कारणं आहेत जी नियंत्रणात आलेली परिस्थिती बिघडवत आहे. यावर सरकारला ताबडतोब पावलं उचलणं गरजेचं आहे. 

भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गाचा आलेख वाढत आहे. गेल्या दोन दिवसात देशभरात १६,००० हून अधिक कोरोनाची प्रकरणं समोर आली आहेत. दररोज बाधित रुग्णांच्या मृताचा आकडा देखील १०० च्या पार पोहोचला आहे. संसर्गाचं प्रमाणं वाढण्यामागे कमी तपासण्या, नवे स्ट्रेन आणि लसीकरणाला उशीर यांसह अशी काही प्रमुख पाच कारणं आहेत जी नियंत्रणात आलेली परिस्थिती बिघडवत आहे. यावर सरकारला ताबडतोब पावलं उचलणं गरजेचं आहे. 

कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ; देशात संसर्गाचा वाढता आलेख कायम!

१) दररोजच्या चाचण्या अर्धवट

आयसीएमआरच्या माहितीनुसार, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात देशात प्रत्येक दिवशी दहा लाखांहून अधिक नमुन्यांची कोविडची चाचणी केली जात होती. मात्र, या वर्षी फेब्रुवारी येईपर्यंत देशात चाचण्यांमध्ये इतकी घट झाली की सध्या दरदिवशी सहा ते आठ लाख नमुन्यांचीच चाचणी होत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ८,३१,८०७ नमुन्यांची चाचणी झाली आहे. देशात आजवर २१,४६,६१,४६५ नमुन्यांची चाचणी झाली आहे. 

२) नमुन्यांच्या पॉझिटिव्हीटीच्या दरात वाढ

देशात दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात घट झाल्यानंतरही पॉझिटिव्हीटीचा दर ५ टक्क्यांहून अधिक राहिला आहे. ही स्थिती हेच दाखवते की गरजेपेक्षा कमी चाचण्या होत असून जितक्या चाचण्या होत आहेत त्यामध्ये पॉझिटिव्हीटीचा दर अधिक आहे. गेल्या महिन्यात देशातील चाचण्यांचा पॉझिटिव्हीचा दर सुमारे ६ टक्के होता, जो या महिन्यात ५ टक्क्यांहून अधिक कायम राहिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की, कोणत्याही देशाचा पॉझिटिव्हीचा दर सातत्याने दोन आठवड्यांपर्यंत पाच टक्के किंवा त्याहून कमी व्हायला हवा. तेव्हाच संक्रमणावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. 

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदीत ३१ मार्चपर्यंत वाढ; डीजीसीएची घोषणा

३) कोरोनाच्या नव्या रुपाचा परिणाम

भारत सरकारच्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये सर्वात आधी आढळून आलेल्या करोनाच्या नव्या रुपाचा भारतात १८० पेक्षा अधिक जणांना संसर्ग झाला आहे. त्याचबरोबर दक्षिण अफ्रिका आणि ब्राझिलवरुन जगातील दुसऱ्या भागात पसरलेल्या आणखी एका रुपाची देखील देशात अनेक प्रकरणं समोर आली आहेत. नुकताच देशात कोरोनाचा नवा विषाणूही आढळून आला आहे. मात्र, संक्रमणासाठी हा स्ट्रेन कारणीभूत असण्याबाबत सरकारने अद्याप पुष्टी दिलेली नाही.  

श्रीलंकेचा चीनच्या कोरोना लशीवर नाही विश्वास, भारतीय लशीला दिली पसंती

४) बचावात्मक उपायांकडे दुर्लक्ष

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, डिसेंबर-जानेवारी महिन्यात देशात कोरोनाच्या संक्रमणात घट झाली आहे. त्यानंतर लोक निष्काळजीपणा करायला लागले तसेच तपासण्यांमध्येही घट झाली. या कारणामुळेही आता देशात महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये संक्रमणाची प्रकरणं वाढली आहेत. तज्ज्ञांचं हे देखील म्हणणं आहे की, भारतात संक्रमणात घट होण्यामागे एक महत्वाचं कारण मोठ्या लोकसंख्येच्या शरीरात कोरोनाशी लढणारी अँटिबॉडी विकसित होणंही कारणीभूत असेल. नुकत्याच समोर आलेल्या सिरो सर्वेंच्या माध्यमातून ही बाबही समोर आली आहे की, देशातील मोठ्या लोकसंख्येला कोरोनाची बाधा होऊनही ती स्वतःहून बरी झाली आहे. या तथ्यांच्या आधारे तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, भारतीयांनी गेल्या महिन्यात संक्रमणात घट झाल्याने अतिउत्साहित होता कामा नये. कारण असे अनेक लोक असू शकतात ज्यांच्या शरिरात लक्षणं दिसत नसली तरी कोरोनाचं संक्रमण असू शकतं. त्यासाठी निष्काळजीपणा बाळगता कामा नये. 

५) लोकसंख्येच्या तुलनेत कमी लसीकरण

ऑक्सफर्ड विद्यापीठ संचलित 'अवर वर्ड इन' या अहवालातील डेटा नुसार, भारतात शंभर लोकांमध्ये एकालाच लस दिली जात आहे. तर ब्रिटनमध्ये १०० लोकांपैकी २७ जणांना, अमेरिकेत शंभरपैकी १९ लोकांना लस दिली जात आहे. जुलै अखेरपर्यंत ३० कोटी लोकांना लस देण्याचं भारताचं लक्ष्य आहे या लक्ष्यापासून भारत बराच दूर आहे. आजवर देशात एकूण १,३४,७२,६४३ लोकांनाच आजवर लस देण्यात आली आहे. तर मार्चअखेरपर्यंत देशात ३ कोटी जनतेला लस द्यायचं आहे. एक मार्चपासून देशात २७ कोटी ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर रुग्णांना लस दिली जाणार आहे. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, देशात लसीकरणाच्या प्रत्येक सेशनमध्ये लक्ष्यच्या तुलनेत ३५ टक्केच लसीकरण झालं आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why is corona infection rise again in India Learn the five main reasons behind this