अण्वस्त्रे प्रथम का नाही वापरायची?

पीटीआय
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

शेजारी देशांच्या धमक्‍या बंद

पर्रीकर म्हणाले, की काही लोक म्हणतात, भारताच्या अण्वस्त्र धोरणात बदल झाला आहे. मात्र, कोणत्याही सरकारदरम्यान या धोरणात बदल झालेला नाही. सुरक्षेचा धोका असल्यास आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, अशा धमक्‍या शेजारी देशांकडून मिळतात. मात्र, ज्या दिवशी सर्जिकल स्ट्राइक झाले, त्यानंतर अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्‍या आलेल्या नाहीत.

नवी दिल्ली - अण्वस्त्र वापराबाबतीत भारताने स्वत:ला जखडून ठेवले असल्याचे मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज व्यक्त केले. अण्वस्त्रांच्या बाबतीत ‘प्रथम वापर न करण्या’च्या धोरणाऐवजी आपण, ‘आम्ही जबाबदार अणुशक्ती आहोत आणि या शक्तीचा बेजबाबदारपणे उपयोग करणार नाही,’ असे का म्हणत नाहीत, असे आश्‍चर्य पर्रीकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले. 

हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी तत्काळ स्पष्ट केले. आपल्या या विधानावरून माध्यमांमध्ये आता भारताचे अणुधोरण बदलले, अशा बातम्या येतील, असाही पर्रीकर यांनी टोमणा मारला. ते म्हणाले, ‘‘सरकारने अणुधोरण बदलले नसून हे माझे वैयक्तिक मत आहे. एक व्यक्ती म्हणून माझी अशीच भावना आहे. अण्वस्त्रांचा वापर प्रथम आपणच केला पाहिजे, असे माझे म्हणणे नाही. मात्र, कधीही काहीही घडू शकते.’’ १९९८ मध्ये अणुचाचणी घेतल्यानंतर भारताने अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे धोरण जाहीर केले होते. सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानला भारताची क्षमता आणि इच्छा समजल्याचेही पर्रीकर म्हणाले.

Web Title: Why not use nuclear weapons first?