अखिलेश, बलात्काराचा आरोपी अजून मंत्री कसा?:राज्यपाल

पीटीआय
रविवार, 5 मार्च 2017

प्रजापती यांच्याविरोधात एका महिलेवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या मुलीच्या विनयंभगासंदर्भातील प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे

नवी दिल्ली - बलात्काराचा आरोप असलेले वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती यांना अजूनही मंत्रिमंडळात स्थान कसे काय आहे, अशी थेट विचारणा उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना केली आहे.

प्रजापती यांच्याविरोधात एका महिलेवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या मुलीच्या विनयंभगासंदर्भातील प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हा एफआयआर दाखल करण्यात आला होता. काल (शनिवार) बलात्काराचा आरोप असलेल्या या मंत्रयांचे पारपत्र जप्त करण्यात येऊन त्याच्याविरोधात "लूक आऊट' नोटिसही बजाविण्यात आली. यानंतर उत्तर प्रदेशचे पोलिसदल या फरार आरोपीस शोधत आहे.

समाजवादी पक्षाकडून प्रजापती यांना देत असलेल्या संरक्षणाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल (शनिवार) जौनपूर येथील प्रचारसभेत केलेल्या भाषणामध्ये केला होता.

"या देशात कोणत्याही चांगल्या कामाचा प्रारंभ हा गायंत्री मंत्राने केला जातो. मात्र कॉंग्रेस-समाजवादी युतीकडून गायत्री प्रजापती मंत्राचे उच्चारण केले जात आहे. प्रजापतींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र मुख्यमंत्री अखिलेश यादव हे त्यांच्या प्रचारार्थ गेले. त्यावेळी प्रजापतीही उपस्थित होते; आणि आता ते पोलिसांना सापडत नाहीत. येथे एका मुलीस न्याय हवा आहे; आणि मुख्यमंत्र्यांकडून गुन्हेगारास संरक्षण दिले जात आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात जेथे एक म्हैस हरवली, तर ती शोधण्यासाठी सरकार धाव घेते; तेथे यापेक्षा मोठा कलंक काय असू शकतो?,'' असे मोदी म्हणाले होते.

या पार्श्‍वभूमीवर, राज्यपालांनी राज्य सरकारची केलेली कानउघाडणी अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

Web Title: Why rape-accused minister still in your cabinet? UP Governor writes to Akhilesh Yadav