...म्हणून #TempleTerrorAttack आणि #ChandniChowk ट्विटर ट्रेंडमध्ये

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जुलै 2019

ट्विटरवर आज मुंबईच्या पावसासोबतच #TempleTerrorAttack आणि #ChandniChowk हे दोन ट्रेण्ड होत आहे. परंतु या ट्रेण्डसोबतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही चर्चा होत आहे. पण ट्विटर युझर्सना बाळासाहेबांची आठवण का होत आहे?

नवी दिल्ली : ट्विटरवर आज मुंबईच्या पावसासोबतच #TempleTerrorAttack आणि #ChandniChowk हे दोन ट्रेण्ड होत आहे. परंतु या ट्रेण्डसोबतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही चर्चा होत आहे. पण ट्विटर युझर्सना बाळासाहेबांची आठवण का होत आहे?

काय आहे प्रकरण?
दिल्लीच्या हौज काजी परिसरात एका क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादानंतर मंदिराची तोडफोड करण्यात आली. जुन्या दिल्लीच्या लाल कुआं बाजारात असलेल्या 'गली दुर्गा मंदिर' रविवारी रात्री उशिरा दगडफेक झाली. हिंदू वस्तीच्या सुरुवातीलाच असलेलं हे मंदिर शंभर वर्ष जुनं आहे. या वस्तीच्या बाहेर दुतर्फा मुस्लीमबहुल परिसर आहे. यानंतर ट्विटरवर #TempleTerrorAttack हा ट्रेण्ड होण्यास सुरुवात झाली. उत्तर भारतातील बरेच ट्विटर युझर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करुन ते आज असते तर अशी घटना घडलीच नसती, अशा आशयाचे ट्वीट करत आहेत.

पार्किंगवरुन वादाचं मंदिरावरील दगडफेकीत रुपांतर
"दुचाकीच्या पार्किंगवरुन वाद सुरु झाला. त्याचं रुपांतर धार्मिक तणावात झालं. रात्री 12 नंतर गल्लीच्या बाहेर गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली. गर्दीने आधी घोषणाबाजी केली आणि काही वेळाने दगडफेकीला सुरुवात केली. तर नशेत असलेल्या काही मुलांनी रविवारी रात्री अकराच्या सुमारास एका तरुणाला मारहाण केली होती. दुचाकीवरुन त्यांच्यात वाद झाला होता. पण तो तरुण जखमी अवस्थेत आपल्या वस्तीत पोहोचला असता, लोकांचा पारा चढला, असा दावा मुस्लीम वस्तीतील स्थानिकांनी केला.

मुस्लीम तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली तर काही आरोपी फरार आहेत. ज्यावेळी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं, त्यानंतर गली दुर्गा मंदिरावर दगडफेक करण्यात आली, असं हौज काजी पोलिस स्टेशनचे एसएचओ सुनील कुमार यांनी सांगितलं.

20 ते 25 जणांच्या जमावाने गली दुर्गा मंदिरात दगडफेक केली. वस्तीत पोहोचताच जमावाने मंदिरात तसंच काही घरांवर दगडफेक केली आणि काही मिनिटांतच तिथून निघून गेले, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. या गल्लीत राहणारे बहुतांश लोक हिंदू असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

तीन आरोपींपैकी एक अल्पवयीन
या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना पकडलं आहे. तीनपैकी एक आरोपी अल्पवयीन असून त्याला ताब्यात घेतलं आहे. तर दोघांना अटक केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तिन्ही आरोपी धार्मिक स्थळाची तोडफोड करता दिसत आहेत, असा स्थानिकांचा दावा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Twitter user remembering Balasaheb Thackarey