
पतीनं पैसे देण्यास नकार दिल्यावर पत्नीनं काचेचा ग्लास फेकून नवऱ्याचं डोकंच फोडलं. डोक्याला काच लागल्यानं तो रक्तबंबाळ झाला.
Valentine Day ला पैसे दिले नाही म्हणून बायकोनं नवऱ्याचं डोकंच फोडलं; डोक्यात पडले 6 टाके
Valentine's Day Special : आज जगभरात प्रेमाचा दिवस साजरा केला जात आहे. 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine's Day) साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांसमोर आपलं प्रेम व्यक्त करतात.
हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी जगभरात लाखो लोक कार्ड, फुलं, चॉकलेट्स देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात. मात्र, आज सगळीकडं प्रेमाचा दिवस साजरा होत असतानाच पश्चिम बंगालमधील कोलकाता इथं एक विचित्र घटना समोर आलीये.
एका पत्नीनं व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी नवऱ्याकडं पंधरा हजार रुपये मागितले. मात्र, पतीनं पैसे देण्यास नकार दिल्यावर पत्नीनं काचेचा ग्लास फेकून नवऱ्याचं डोकंच फोडलं.
डोक्याला काच लागल्यानं तो रक्तबंबाळ झाला. त्या अवस्थेत शेजारच्यांनी त्याला रुग्णालयात नेलं. यामध्ये महिलेच्या पतीला 6 टाके पडले असून नवऱ्यानं पोलीस स्थानकात पत्नीविरोधात तक्रार दाखल केलीये.
कोलकात्यातील नरेंद्रपूरमधील ही घटना आहे. नरेंद्रपूरच्या अजीत चौधरी (Ajit Chaudhary) यांनी पत्नी मामोनीवर डोकं फोडणं, पंधरा हजार रुपये बळजबरीनं काढून घेणं आणि गाडीच्या चावी घेतल्याचा आरोप केलाय.
या घटनेत पीडित पतीनं आपल्या पत्नीविरोधात नरेंद्रपूर पोलीस ठाण्यात (Narendrapur Police Station) तक्रार दाखल केलीये. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.