
Divorce Case : वय लपवत पत्नीकडून फसवणूक; न्यायालयाने आधी पतीची याचिका फेटाळली पण नंतर...
घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये हिंसा सामान्यपणे कारण असतं. पण एका अनोख्या निकालात कर्नाटक उच्च न्यायालयाने एका पुरुषाला त्याच्या पत्नीने फसवणूक केल्याच्या कारणावरून घटस्फोट मंजूर केला. या महिलेने लग्नाच्या वेळी वयाच्या बाबतीत घोळ केला होता.
ही महिला तिच्या पतीपेक्षा ५ वर्षांनी मोठी होती पण जेव्हा तिचे लग्न झाले तेव्हा तिने तिचे वय ३६ वर्षे सांगितले. या आधारे पतीने घटस्फोटाची केस दाखल केली होती. महिलेने आपल्या पतीची फसवणूक केल्याचं न्यायालयानं आपल्या निर्णयात मान्य केलं आहे.

न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती विजयकुमार पाटील यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्याआधी कौटुंबिक न्यायालयाने तक्रारदार घटस्फोटाचं कारण सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे पतीची याचिका फेटाळून लावली होती. एका ख्रिश्चन जोडप्याचा हा खटला आहे. दोघांनी २०१४ मध्ये लग्न केलं होतं. महिलेच्या कुटुंबीयांनी नातेवाइकांसह मुलीचे वय ३६ वर्षे असल्याचं सांगितलं.
महिला बऱ्याच दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त होती, असा आरोपही पतीने केला होता, मात्र त्याबाबत पतीला काही सांगण्यात आलं नव्हतं. तिच्या वारंवार चौकशीत हा आजार उघड झाला आणि लग्नाच्या वेळी महिलेचे योग्य वय ४१ वर्षे असल्याचेही समोर आलं. कोर्टाने निकाल देताना म्हटलं की, तक्रारदाराची पत्नी त्याच्यापेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे आणि पतीची फसवणूक झाली आहे, त्यामुळे घटस्फोटाची परवानगी देत आहोत.
कोर्टाने सांगितलं की, महिलेने उलटतपासणीत कबूल केलं आहे की लग्नाच्या वेळी तिचं वय ४१ वर्षे होतं, त्यामुळे या गोष्टींवर विश्वास ठेवण्याचे कारण नाही. भारतीय घटस्फोट कायद्याच्या कलम १८ आणि कलम १९ चा हवाला देत न्यायालयाने हे लग्न अवैध ठरवलं आहे. कलम १८ आणि १९ पती किंवा पत्नीला फसवणुकीच्या कारणास्तव त्यांचे विवाह रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्याचा अधिकार देतात.