शिवसेनेसोबत लोकसभेसह विधानसभेतही युती : अमित शहा

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

घरात छोट्यामोठ्या कुरबुरी असतात. मात्र, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप शिवसेनेसोबत युती करणार आहे.

- अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज (बुधवार) मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शहा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. तत्पूर्वी अमित शहा यांनी शिवसेनेसोबत लोकसभेसह विधानसभेतही युती करणार असल्याचे संकेत दिले. 

मुंबई दौऱ्यावर असलेले अमित शहा उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेणार आहेत. त्या भेटीपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, घरात छोट्यामोठ्या कुरबुरी असतात. मात्र, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप शिवसेनेसोबत युती करणार आहे, असा दावा अमित शहा यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेसने जातीय तेढ वाढविण्यासाठी एजन्सी नेमली. अत्याचाराच्या आणि जातीय तेढच्या ज्या घटना घडत आहे. त्या सर्वाला काँग्रेस कारणीभूत आहे, असा आरोपही त्यांनी केला.  

दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामाना'तून आज भाजपवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर अमित शहा उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर जाणार नसल्याचे सांगितले जात होते. तसेच मातोश्रीच्या भेटीबाबत उल्लेखही करण्यात आलेला नाही. तत्पूर्वी अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीपूर्वी युती होणार असल्याचे सांगितले. 

Web Title: Will Alliance with shivsena for Lok Sabha and Assembly Election says Amit Shah