मेहबूबांनी पुन्हा सूर बदलला; तिरंग्याबद्दलच्या वक्तव्याबाबत केला खुुलासा

वृत्तसंस्था
Monday, 9 November 2020

हाफ चड्डी घालून बसणाऱ्या लोकांच्या मुख्यालयावर तिरंगा फडकावला जात नाही आणि ते आम्हाला राष्ट्रध्वजावरून धडे देत आहेत.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या तिरंगा न उचलण्याच्या विधानावरून देशभरात सगळीकडे बरीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुफ्ती यांनी आता आपल्या विधानाबाबत खुलासा केला आहे. आमदार झाल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या घटनेवर विश्वास ठेवण्याची आणि भारताची एकता व अखंडतेचे रक्षण करण्याची शपथ घेतली. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत जम्मू-काश्मीरच्या झेंड्यासोबत तिरंगा उचलण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

तेजस्वी फिरले अन्‌ युवकांच्या मनात भरले!

१४ महिन्याच्या नजरकैदेतून जेव्हा मुफ्ती बाहेर आल्या तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी कलम ३७० मधील तरतुदी पूर्ववत होत नाहीत, तो पर्यंत तिरंगा उचलणार नाही, असे वक्तव्य केल्याने देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. भाजप कार्यकर्त्यांनी तिरंगा घेऊन पीडीपीच्या कार्यालयांबाहेर निदर्शने केली होती. श्रीनगर येथील लाल चौकात तिरंगा फडकवायला निघालेल्या बीजेपीच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.  

हाफ चड्डीवाले आम्हाला तिरंग्यावरून धडे देतायत
मेहबूबा मुफ्ती या ५ दिवस जम्मूच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरएसएस आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या, ''हजारो कार्यकर्त्यांच्या बलिदानाच्या बळावर काश्मीरींनी वर्षानुवर्षे तिरंगा फडकावत ठेवला आहे. हाफ चड्डी घालून बसणाऱ्या लोकांच्या मुख्यालयावर तिरंगा फडकावला जात नाही आणि ते आम्हाला राष्ट्रध्वजावरून धडे देत आहेत.''   

केंद्र सरकारमुळेच काश्मीरी तरुणांनी हाती शस्त्रे घेतली; मेहबुबा मुफ्तींची केंद्र सरकारवर टीका​

भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता टिकवून ठेवेन
मेहबूबा पुढे म्हणाल्या, ''जम्मू-काश्मीरच्या घटनेवर आपला विश्वास आहे आणि भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवू, अशी आम्ही सर्वांनी भाजपच्या सदस्यांसह विधानसभा आणि विधानपरिषदेत शपथ घेतली होती. आमदार झाल्यावर मी शपथ घेत भारतीय संविधान आणि सार्वभौमत्वावर विश्वास आहे आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी सचोटी राखेल, असे म्हटले होते. या दोन्ही परस्पर गोष्टी आहेत. जम्मू-काश्मीरचा झेंडा आणि तिरंगा मी दोन्ही एकत्र धरेन. पण, आम्हाला आमचा झेंडा आणि घटना परत द्या.''

नागालँडच्या लोकांनी अलीकडेच या देशाचा ध्वज आणि राज्यघटना त्यांना मान्य नसल्याचे स्पष्ट केले. मग हे हाफ चड्डी घालणारे लोक त्यांच्याविरूद्ध मोर्चा का काढत नाहीत? जेव्हा मी दोन्ही ध्वज एकत्रित उचलेन असे म्हटले होते, तेव्हा त्यांनी माझा विरोध केला, माझे पुतळे जाळले, पण जेव्हा नागालँडमधील लोक जाहीरपणे असे बोलतात तेव्हा त्यांना आवाज येत नाही. टीव्हीवर वाद-विवाद होत नाहीत, असेही मेहबूबा यांनी म्हटले आहे.

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will hold both tricolour and Jammu and Kashmir flag together says Mehbooba Mufti