esakal | प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये करणार प्रवेश? चर्चांना उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

Prashant Kishor

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये करणार प्रवेश? चर्चांना उधाण

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आठवड्याभरापूर्वी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे पक्षाच्या धोरणांमध्ये बसू शकतात का? याबाबत विचारणा करण्यात आली. ही बैठक २२ जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली होती. यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ, मल्लिकार्जुन खर्गे, ए. के. अॅन्टोनी, अजय माकन, आनंद शर्मा, हरिश रावत, अंबिका सोनी आणि के. सी. वेणुगोपाल यांचा समावेश होता. (Will Prashant Kishor join Congress rumors within congress aau85)

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा तपशील या बैठकीत शेअर केला होता. राहुल गांधींसोबतच्या बैठकीत किशोर यांनी काँग्रेस पक्षात त्यांच्या स्वतःच्या भूमिकेबाबत माहिती दिली होती. "राहुल गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्या केवळ सल्लागार नव्हे तर काँग्रेस पक्षात प्रवेशाची शक्यता वर्तवली होती. यावर साधक-बाधक चर्चा करुन नेत्यांची मतंही मागवली होती," असं काँग्रेस नेत्यांच्या बैठकीतील एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं.

प्रशांत किशोर हे काँग्रेस पक्षासाठी अतिरिक्त मूल्य ठरु शकेल. त्यांची भूमिका निश्चित करणं गरजेचं आहे, असंही या काँग्रेस नेत्यानं म्हटलं आहे. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी संयुक्त जनता दलात (जेडीयू) प्रवेश केला होता. पण या पक्षात ते मोठा करिश्मा दाखवू शकले नव्हते. पण काँग्रेस किशोर यांच्या कामासाठी निश्चित मर्यादा आखू शकते, असंही काँग्रेस नेत्यानं म्हटलं आहे.

त्याचबरोबर काँग्रेस पक्षासाठी ताज्या कल्पना आणि निवडणूक रणनीती तयार करण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांना काँग्रेस पक्षात घेणं हे पक्षासाठी धोकादायक नसेल. पण त्यांच्या क्षमतेवर चर्चा होणं गरजेचं आहे, असंही काँग्रेसच्या आणखी एका नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

प्रशांत किशोर यांनी नुकतीच राहुल गांधी आणि प्रयांका गांधी यांची भेट घेतली होती. सन २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाच्या योजनेवर त्यांच्यामध्ये चर्चा झाली. त्याचबरोबर २०२२मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीवरही त्यांच्यात चर्चा झाली. एकप्रकारे प्रशांत किशोर आणि गांधींमधील ही बैठक ब्रेनस्टॉर्मिंग करणारी होती.

loading image
go to top