
मध्य प्रदेशातील गुणा येथील बसपच्या उमेदवाराने हत्तीला वाऱ्यावर सोडून कॉंग्रेसचा हात हातामध्ये घेतल्यानंतर "बसप'च्या सर्वेसर्वा मायावती संतापल्या आहेत. मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या कमलनाथ सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा आम्ही पुनर्विचार करून काँग्रेसचे सरकार पाडू अशी धमकीच मायावती यांनी दिली आहे.
भोपाळ: मध्य प्रदेशातील गुणा येथील बहुजन समाज पक्षाच्या (बसप) उमेदवाराने हत्तीला वाऱ्यावर सोडून कॉंग्रेसचा हात हातामध्ये घेतल्यानंतर "बसप'च्या सर्वेसर्वा मायावती संतापल्या आहेत. मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या कमलनाथ सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा आम्ही पुनर्विचार करून काँग्रेसचे सरकार पाडू अशी धमकीच मायावती यांनी दिली आहे. हा काँग्रेसला मोठा झटका असून, मध्यप्रदेशात काँग्रेस सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
गुणा येथील बसपचे उमेदवार लोकेंद्रसिंह राजपूत यांनी सोमवारी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करताना कॉंग्रेसचे विद्यमान खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना पाठिंबा दिला होता. या संदर्भात मायावती यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे, "शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्यामध्ये भाजपप्रमाणेच कॉंग्रेसदेखील आघाडीवर आहे. कॉंग्रेसने गुणातील आमच्या उमेदवाराला धमकी देत त्याला उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले. पण "बसप'देखील येथे आपल्या निवडणूक चिन्हावर लढून सडेतोड उत्तर देईल. मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही, यावर आम्ही पुनर्विचार करू.''
जागांचे गणित
मागील वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने 114 जागा जिंकल्या होत्या, येथे बहुमतासाठी कॉंग्रेसला दोन जागांची गरज होती. बहुजन समाज पक्षाचे दोन, समाजवादी पक्षाचा एक आणि चार अपक्षांचा पाठिंबा घेत कॉंग्रेसने येथे सरकार स्थापन केले होते. येथे भाजपला 109 जागांवर समाधान मानावे लागले होते.