किरण बेदी देणार नायब राज्यपालपदाचा राजीनामा

वृत्तसंस्था
रविवार, 8 जानेवारी 2017

मी माझा कार्यकाल निश्‍चित केला आहे. 29 मे 2018 ला मी पदभार सोडणार आहे.

पुदुच्चेरी - भाजप नेत्या आणि पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी मे 2018 मध्ये पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे.

काँग्रेस सरकारबरोबर संघर्ष वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर किरण बेदी यांनी दोन वर्षांचा कार्यकाल समाप्त झाल्यानंतर राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. "मी माझा कार्यकाल निश्‍चित केला आहे. 29 मे 2018 ला मी पदभार सोडणार आहे,' असे बेदी यांनी "पीटीआय'शी बोलताना सांगितले. याबाबत वरिष्ठांना कळविल्याचेही त्यांनी सांगितले. 

बेदी आणि येथील मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यात अनेकदा वाद झाले आहेत. सोशल मीडियाचा सरकारी कामासाठी वापर करू नये, हा नारायणसामींचा आदेश त्यांनी रद्द केल्यावरून निर्माण झालेला वाद अद्यापही ताजा आहे. तसेच एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये बेदींचा समावेश असताना त्यावर अश्लिल व्हिडिओ पाठविल्याने, बेदींनी त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. यावरून वाद झाला होता. बेदी या दिल्लीत 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार होत्या.

Web Title: Will resign when I complete two years in office: Puducherry LG Kiran Bedi