‘यूपी’तही पश्‍चिम बंगालची पुनरावृत्ती होणार?

मुस्लिमांची एकगठ्ठा मते भाजपविरोधात जाण्याची शक्यता
jp nadda
jp naddasakal

नवी दिल्ली: भाजपने विनसभेच्या आगामी निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीबाबत विचारमंथन केले. विशेषतः उत्तरप्रदेशात मुस्लिम समाज एकजुटीने भाजपच्या विरोधात बव्हंशी समाजवादी पक्षाला मतदान करण्याची चिन्हे असल्याचा फीडबॅक भाजप नेतृत्वाला दिल्लीत मिळाल्याने नड्डा यांनी आजच्या बैठकीत त्या मुद्यावर विशेष चर्चा केल्याचे समजते

उत्तरप्रदेशासह ५ राज्यांत पुढील काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानल्या जात आहेत. साहजिकच भाजपने यासाठी बूथ पातळीपासून तयारीला प्रारंभ केला आहे. उत्तराखंड व काही प्रमाणात गोव्यात भाजपसाठी वाटते एवढी अनुकूल परिस्थिती नाही. शेतकरी आंदोलनाचा जोर असलेल्या पंजाबमध्ये भाजपसाठी यंदा प्रतिकूल परिस्थिती दिसत आहे. मात्र माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या प्रस्तावित नव्या पक्षाकडून भाजपला मदतीची अपेक्षा आहे. उत्तरप्रदेश हे देशाच्या राजकीय परिघातील सर्वांत महत्त्वाचे राज्य असून ते लोकसभेची चावी मानली जाते. भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने काहीशा अनिच्छेने यंदा योगी आदित्यनाथ यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे दिली. मात्र उमेदवार ठरविण्यापासून साऱ्या गोष्टी या दिल्लीतच होतील असे त्यांच्याकडून कबूल करून घेतले.

योगी आदित्यनाथ हे ‘एकला चलो’ वृत्तीचे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्याशी केंद्रीय पातळीवरून फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व नड्डा हे तिघेच संवाद साधू शकतात असेही भाजपमध्ये बोलले जाते. दिल्लीत आलेल्या फिडबॅकनुसार उत्तरप्रदेशात १९ टक्के इतक्या लक्षणीय प्रमाणात असलेली मुस्लिम मतपेढी यावेळी पश्चिम बंगाल फॉर्म्युला वापरण्याची चिन्हे असल्याचे वृत्त दिल्लीत धडकले आहे. म्हणजे केवळ ‘भाजपला विरोध'' या एका मुद्यावर उत्तर प्रदेशातील मुस्लिम एकजुटीने समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना भरभरून मतांचे दान देण्याच्या मनःस्थितीत आहेत.

jp nadda
जम्मू -काश्मीर :शोपियानमध्ये चकमक; 1 दहशतवाद्याचा खात्मा

शंभर जागांवर मुस्लिम मते निर्णायक

उत्तरप्रदेशात विधानसभेच्या किमान १०० जागांवर मुस्लिम मते निर्णायक ठरतात. उत्तरप्रदेशात एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी हेही मैदानात उतरले असले तरी याआधी पश्‍चिम बंगालमध्ये त्यांची जादू चालली नव्हती. तेथे मुस्लिम समाजाने मते न फुटण्याची दक्षता घेत त्यांच्यासह डावे, कॉंग्रेस व फुरफुरा शरीफलाही धुडकावून लावले होते. येथे मुस्लिमांची एकगठ्ठा मते ममतांच्या पारड्यात पडली होती.

तर जागा घटणार

जाणकारांच्या म्हणण्यानुसार मुसलमान समाजाने एकगठ्ठा मतदान केले तर भाजपसाठी ते आव्हान मोठे ठरू शकते. राजकीय विश्लेषक सईद अन्सारी यांच्या म्हणण्यानुसार हा प्रयोग यापूर्वी मध्यप्रदेश व इतर काही ठिकाणी झाला होता. मात्र बंगालमध्ये तो ठसठशीतपणे राबविला गेला. साहजिकच उत्तर प्रदेशात जर मुसलमानांनी एकजूट दाखविली तर भाजपच्या जागा निश्चितपणे कमी होऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com