पेन्शन 600 देणगी 500 रुपये; कोरोनाच्या काळातलं सर्वांत मौल्यवान दान!

Kamalamma
Kamalamma

म्हैसूर : कोरोना व्हायरस या जागतिक महामारीनं अनेकांचे जीवन उद्ध्वस्त केलं आहे. कष्टकरी कामगार, रोजंदारी करणारे मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. देशावर ओढवलेल्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक सेलिब्रिटी, व्यावसायिक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती यांनी त्यांना जमेल तशी मदत केली. मात्र, म्हैसूर येथील एक महिला आपल्या अशाच कामगिरीमुळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

तिनं जी कृती केली आहे ती अनेकांच्या स्मरणात राहिल अशीच आहे. तिने किती रुपयांचे दान केलं ही गौण गोष्ट. मात्र, आपल्या आर्थिक कुवतीनुसार तिनं केलेलं दान हे कितीतरी किलो सोनं दान केल्यासारखं आहे. 

आपल्या आयुष्यातील उरलेली शेवटची काही वर्षे मोजणाऱ्या या महिलेला महिनाकाठी पेन्शन स्वरुपात जी रक्कम मिळते, त्या रकमेतून ती हसत खेळत आयुष्य जगत आहे. तिनं दिलेलं योगदान जरी नगण्य वाटत असलं तरी त्याची किंमत करता येणार नाही. 

तिचं नाव कमलम्मा, वय वर्ष ७०. म्हैसूरमधील चेन्नगिरी कोप्पल येथे ती राहते. आणि मोलकरीण म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करते. देशभरात कोरोनाचे संकट गडद होत गेल्याने तिच्या वयाचा विचार करत नागरिकांनी तिला काम सोडण्यास सांगितले. आणि तिने आपली नोकरी गमावली. तिला दोन मुलगे असले तरी पतीच्या निधनानंतर ती स्वावलंबी जीवन जगत आहे. महिनाकाठी तिला ६०० रुपये पेन्शन मिळते. 

लॉकडाउनमुळे अनेकांच्या खाण्या-पिण्याचे हाल झाले. ती त्यालाही अपवाद ठरली नाही. तिची दुर्दशा ऐकून स्थानिक सामाजिक कार्यकर्ते महादेव यांनी रोटरी हेरिटेज म्हैसूरच्या तालकडू मंजुनाथ यांच्याकडे संपर्क साधला. त्यानंतर क्लबने चेन्नगिरी कोप्पल आणि आजूबाजूच्या गावांमध्ये अन्नदानाची व्यवस्था केली. कमलम्मालाही दररोज खाद्यपदार्थांची पाकिटे मिळू लागली. 

दरम्यान, एके दिवशी कमलम्माने कोविड रिलीफ फंडसाठी ५०० रुपये देण्याची इच्छा महादेव यांच्यापाशी व्यक्त केली आणि तिने ते दिलेही. त्यानंतर तिने पुढील महिन्याच्या पेन्शनमधून रोटरी हेरिटेजलाही ५०० रुपयांची मदत देऊ केली. क्लबच्या सदस्यांनी तिच्याकडून मदत घेण्यास नकार दिला. मात्र, ही एक छोटी रक्कम आहे. या रकमेतून गरजूंना मदत करा, अशी इच्छा व्यक्त केल्याने आम्ही ते स्वीकारले, अशी माहिती रोटरी हेरिटेज म्हैसूरचे डी. एन. रघु राघवेंद्र यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

ते पुढे म्हणाले, ''गेले महिनाभर आम्ही तिला जेवण पुरविले. त्याबदल्यात तिने आमच्याकडे ही रक्कम दिली. तिला ६०० रुपये पेन्शन मिळते आणि तरीदेखील तिने ५०० रुपये मदतनिधी दिला याचे आम्हाला आश्चर्य वाटले आणि थोडी लाजही वाटली. आम्ही तिचा आदर केला पाहिजे, म्हणून ते पैसे आम्ही स्वीकारले.''

मासिक कमाईच्या ९० टक्के हिस्सा तिने मदतनिधी म्हणून दिला. त्यामुळे टाटा, अंबानी, अझीम प्रेमजी किंवा नारायण मूर्तींपेक्षा ती कमी ठरत नाही. ती परिस्थितीने गरीब आहे, मात्र, एका आईच्या अंत:करणाच्या विशालतेचे आम्ही साक्षीदार होऊ शकलो. आम्ही खरोखरच तिच्यापुढे नम्र झालो, असे राघवेंद्र यांनी म्हटले आहे. कमलम्माच्या दातृत्वाला सोशल मीडियाद्वारे अनेक नेटकऱ्यांनी सलाम ठोकला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com