महिला पत्रकाराच्या गालाला राज्यपालांनी केला स्पर्श ; टीकेनंतर लेखी माफीनामा

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 एप्रिल 2018

"ती मला नातीसारखी' 

लक्ष्मी सुब्रह्मण्यमला लिहिलेल्या माफीनाम्यात राज्यपालांनी म्हटले आहे, की ती मला नातीसारखी असून, तिच्या पत्रकारितेचे कौतुक म्हणून आपुलकीच्या नात्याने तिच्या गालाला स्पर्श केला. या घटनेने तू दुखावली गेली, हे तुझ्याकडून समजले. याबद्दल मी माफी मागतो. तुझ्या भावना दुखावल्या गेल्याने मी दिलगिरी व्यक्त करतो.

चेन्नई : महिला पत्रकाराच्या गालाला विनासंमती स्पर्श केल्याने तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित चांगलेच अडचणीत सापडले. त्यांच्या या कृतीचा सर्वत्र निषेध करण्यात आला. अखेर राज्यपालांनी संबंधित पत्रकाराची बुधवारी लेखी माफी मागितली. पुरोहित यांना माफ केल्याचे सांगताना यामागील हेतूबद्दल मात्र तिने शंका उपस्थित केली. 

तमिळनाडूतील अरुप्पूकोट्टईमधील देवांग आर्ट महाविद्यालयातील सध्या गाजत असलेल्या "पदवीच्या बदल्यात सेक्‍स'प्रकरणातील आरोपी प्राध्यापिकेने राज्यपाल पुरोहित यांचे नाव घेतले होते. त्याचा खुलासा करण्यासाठी राज्यपालांनी आज पत्रकार परिषद बोलाविली होती. ती संपताना त्यांनी नवा वाद ओढवून घेतला. तेथे उपस्थित असलेल्या लक्ष्मी सुब्रह्मण्यम या पत्रकाराच्या प्रश्‍नाला उत्तर देण्याऐवजी राज्यपालांनी तिच्या गालाला स्पर्श करीत थापटी मारली. राज्यपालांच्या या कृतीने ती अस्वस्थ झाली. या घटनेनंतर आपण अनेक वेळी तोंड धुतले, पण ही गोष्ट विसरू शकले नाही, असे लक्ष्मीने सांगितले. राज्यपालांचा माफीनामा आपण स्वीकारला असला, तरी या कृतीमागील त्यांच्या हेतूबद्दल अजूनही शंका वाटते, असे तिने म्हटले आहे. 

राज्यपालांच्या या वर्तनाने पत्रकारांमध्ये संताप व्यक्त केला. द्रमुकसह अन्य विरोधी पक्षांनीही याचा निषेध केला आहे. लक्ष्मीने मेलद्वारे आपल्या भावना राज्यपालांना कळविल्या. यामुळे अखेर पुरोहित यांना लक्ष्मी सुब्रह्मण्यमची लेखी माफी मागणे भाग पडले.

Web Title: Women Journalist Misbehaviour by Governor Tamilnadu